लहानपणी साधकाच्या पोटात दुखत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांनी एका आजोबांच्या रूपात येऊन काळजी घेणे

श्री. दीप पाटणे

‘मी इयत्ता ३ रीमध्ये असतांना मिरज येथील एका रुग्णालयात माझे आंत्रपुच्छाचे (‘अपेंडिक्स’चे) शस्त्रकर्म झाले. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी मला चालण्यास सांगितले होते; पण चालतांना माझ्या पोटात फार दुखायचे. एकदा माझे बाबा औषधे आणण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेर गेले होते. थोड्या वेळाने माझ्या पोटात पुष्कळ दुखू लागले आणि मी रडू लागलो. मी रडत रडत रुग्णालयाच्या परिसरात येऊन बाबांची वाट पहात बाकावर बसलो. माझे पोटाचे दुखणे वाढल्याने मी आणखी जोरात रडू लागलो.

मी रुग्णालयाच्या परिसरात बसून रडत असतांना एक वयस्कर व्यक्ती (आजोबा) माझ्या जवळ आली. तिने प.पू. भक्तराज यांच्यासारखा पांढरा सदरा, पायजमा, काळा कोट आणि टोपी घातली होती. तिच्या हातात प.पू. भक्तराज यांच्यासारखीच काठीही होती. ते माझ्या जवळ येऊन बसले. त्या आजोबांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवून मला रडण्याचे कारण विचारले. मी त्यांना मला होत असलेला त्रास सांगितला. तेव्हा ते माझ्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवत मला गोष्ट सांगू लागले. ती गोष्ट ऐकतांना मी माझ्या पोटदुखीचा त्रास पूर्णपणे विसरलो. गोष्ट सांगत असतांना मधूनच त्यांनी मला विचारले, ‘‘ते तुझे बाबा आहेत का ?’’ त्यांनी असे म्हटल्यावर मी मागे पाहिले. तेव्हा मला माझे बाबा रुग्णालयात जातांना दिसले. मी तात्काळ माझ्या बाबांकडे जाण्यासाठी तेथून निघालो. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘बाबा नसतांना ज्यांनी माझी एवढी काळजी घेतली आणि प्रेम दिले, त्या आजोबांची अन् बाबांची भेट घालून देऊया.’ त्या विचारांतच मी परत पाठी फिरलो. तेथील परिसरात मी त्या आजोबांना बरेच शोधले; पण ते मला कुठेच दिसले नाहीत. ५ – ६ सेकंदांतच ते आजोबा अदृश्य झाले होते. हा सर्व वृत्तांत मी माझ्या बाबांना सांगितला. तेव्हा बाबा मला सहजतेने म्हणाले, ‘‘प.पू. भक्तराज महाराज यांनी तुझी काळजी घेतली.’’

– श्री. दीप संतोष पाटणे (वय २१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.११.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक