वर्ल्ड उघूर काँग्रेस संघटनेला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन

चीनकडून टीका

वॉशिंगटन – चीनमधील उघूर मुसलमानांच्या अधिकारांसाठी काम करणारी संघटना ‘वर्ल्ड उघूर काँग्रेस’ला वर्ष २०२३ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. कॅनडाचे खासदार, नॉर्वेचे नेते आणि राजकीय पक्ष ‘नॉर्वे वेंस्ट्रे’च्या युवक संघटनेने या संघटनेचे नाव सूचित केले आहे. डिसेंबरमध्ये या संदर्भात घोषणा करण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कार देणार्‍या समितीने या संघटनेचे नाव घोषित केलेले नसले, तरी तिला सूचित करणार्‍यांनी नाव घोषित केले आहे.

वर्ल्ड उघूर काँग्रेसला नामांकन मिळाल्याच्या वृत्तावर अमेरिकेतील चिनी दूतावासाने टीका केली आहे. दूतावासाने म्हटले आहे की, या कथित संघटनेचे संबंध आतंकवादी संघटनांशी आहे. अशा संघटनेला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करणे जागतिक शांततेसाठी हानीकारक आहे.