गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) – गेल्या २ दिवसांपासून गांधीनगर येथे मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी २५ जणांचा चावा घेतला आहे. यांतील काही जणांवर गांधीनगर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ग्रामस्थांनी याविषयी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही.
निष्क्रीय प्रशासनाच्या विरोधात गटविकास अधिकार्यांना निवेदन देणार ! – राजू यादव
या संदर्भात उद्धव ठाकरे गट करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘भटकी कुत्री चावल्याने नागरिक घायाळ झाल्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. गांधीनगर बाजारपेठत भटक्या कुत्र्यांसमवेत भटक्या गाढवांची समस्याही गंभीर आहे.
गेल्याच आठवड्यात एका नागरिकास भटके गाढव चावल्याची घटना घडली होती. याविषयी ग्रामपंचायत स्तरावर कोणतीच कारवाई होत नसल्याने आम्ही गटविकास अधिकार्यांना भेटून निवेदन देणार आहोत, तसेच प्रसंगी प्रशासनास जाग येण्यासाठी आंदोलन करू.’’
संपादकीय भुमिकानिष्क्रीय आणि दायित्वशून्य प्रशासन ! |