रत्नागिरी – महामार्गाच्या रुंदीकरणामुळे अनेकांच्या जागा गेल्या आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांची मूळ घरे पाडावी लागली आहेत. यामध्ये काहींनी जुनी घरे पाडून सुरक्षित अंतरावर स्वत:ची नवीन घरे उभी केली आहेत. जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील करंजारी येथील ठाकूर यांनी मात्र त्यांचा बंगला नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने १०० फूट मागे सरकावण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन तंत्रज्ञानानुसार या बंगल्याची कोणतीही मोडतोड न करता, तो आहे त्या स्थितीत मागे नेण्याचे काम चेन्नई येथील आस्थापन करणार आहे. या आस्थापनाने बंगल्याच्या खाली खोदाई करून त्याखाली ‘जॅक’ आणि लोखंडी ‘अँगल’ लावून हा मूळ बंगला हळूहळू सरकवण्याचे काम चालू केले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच बंगला मागे नेण्याची घटना घडत आहे, त्यामुळे हे पहाण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.