‘एकदा दैवी सत्संगात आम्ही (कु. अपाला औंधकर आणि कु. प्रार्थना पाठक) ‘ईश्वरेच्छेने वागण्याचे महत्त्व’ याविषयी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या !
‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. प्रसिद्ध झालेल्या त्या छायाचित्रांकडे पाहून साधकांना ‘नामजप चालू होणे, भाव जागृत होणे, चैतन्य जाणवणे, प्रकाश जाणवणे, थंडावा जाणवणे, मन निर्विचार होणे, शांत वाटणे’, यांच्यापैकी काही अनुभूती आल्यास त्यांनी ‘सनातन प्रभात’चा तो अंक स्वतःकडे संग्रही ठेवावा. साधकांनी अनुभूती आलेल्या त्या छायाचित्राकडे बघून नामजप करावा. अशा प्रकारे साधकांनी ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या छायाचित्रांचा आध्यात्मिक उपायांसाठी लाभ करून घ्यावा.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |
१. कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
१ अ. ईश्वरेच्छेने वागण्याचे महत्त्व
१ अ १. ईश्वराने सांगितल्यानुसार आचरण करणे, म्हणजेच ईश्वरेच्छेने वागणे ! : ‘ईश्वरेच्छा’ म्हणजे काय ? ‘ईश्वरेच्छा’ म्हणजे ईश्वराची किंवा भगवंताची इच्छा ! ईश्वराने सांगितल्यानुसार आचरण करणे, म्हणजेच ईश्वरेच्छेने वागणे ! ही स्थिती येणे कठीण असते; परंतु स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्याने हळूहळू आपल्यालाही ‘ईश्वरेच्छा म्हणजे काय ?’, हे अनुभवता आल्याने आपल्या मनावर त्याचा संस्कार होऊ लागतो.
१ अ २. प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहून सर्वकाही ईश्वरावर सोपवणे, म्हणजेच ईश्वरेच्छेने वागणे : सारे जग ईश्वराच्याच इच्छेने चालते. ‘ईश्वरेच्छा’ ही सर्वात श्रेष्ठ असून ती आपल्याला गुरु किंवा भगवंत यांचे आज्ञापालन करायला शिकवते. संत सतत ईश्वरेच्छेने आचरण करतात. ते सतत देवाच्या अनुसंधानात असल्याने ईश्वराचे विचार ग्रहण करू शकतात. आपल्यालाही सतत ईश्वराच्या अनुसंधानात राहून तळमळीने साधना करायची आहे. प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहून सर्वकाही ईश्वरावर सोपवणे, म्हणजेच ईश्वरेच्छेने वागणे होय.
१ अ ३. ‘आपल्या मनाप्रमाणे न घडणार्या गोष्टीतही ईश्वरेच्छा आहे’, हे समजून घेतल्यास आपल्याला खरा आनंद अनुभवता येणे : आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी घडतात. काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात, तर काही आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत. ज्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात, त्या वेळी सुख मिळते, तसेच ज्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत, ‘तिथे ईश्वरेच्छा आहे’, हे समजून घेतले, तर आपल्याला खरा आनंद अनुभवता येऊ शकतो.
१ अ ४. ‘ईश्वरेच्छेनेच सर्वकाही होत असून त्यातच माझा उद्धार होणार आहे’, अशी श्रद्धा ठेवल्यास ईश्वरच कठीण प्रसंगातून तारून नेत असणे : ईश्वरेच्छा ही आपल्याला घडलेल्या प्रसंगांमधूनच ओळखता येते. आपल्या जीवनात एखादा कठीण प्रसंग आला, नवीन सेवा मिळाली किंवा आपली प्रगती झाली, तर तीही ईश्वराचीच इच्छा असते. ईश्वराने आपल्यासाठी जे नियोजन केले असते, ते सर्वतोपरी उत्तमच असून दिव्यही असते. त्यामुळे आपण सर्वांनी ‘ईश्वरेच्छेनेच सर्वकाही होत असून त्यातच माझा उद्धार होणार आहे’, अशी श्रद्धा ठेवली, तर ईश्वरच आपल्याला कठीण प्रसंगातून तारून नेतो.
१ अ ५. आपण सर्वकाही ईश्वरावर सोपवून आपली साधना आणि सेवा अखंड चालू ठेवूया ! : आपण सर्वकाही ईश्वरावर सोपवून आपली साधना आणि सेवा अखंड चालू ठेवूया. आपल्या मनात ज्या वेळी स्वतःविषयीचे विचार येतील, त्या वेळी आपण ते अन्यांना सांगून परेच्छेने वागूया. स्वेच्छेचा त्याग करून परेच्छेने वागणे आणि त्यानंतर ईश्वरेच्छेने वागणे, हे प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) पुष्कळ आवडणार आहे.
१ आ. गुरुदेव साधकांना निर्गुणाकडे घेऊन जात असल्याने साधकांना संसारात राहूनही न राहिल्याप्रमाणे वाटणे आणि साधकांच्या जीवनात गुरुदेवच सामावलेले असणे : हे गुरुदेवा, तुम्हीच आमच्याकडून तुमचे नामसंकीर्तन करून घेऊन आम्हाला निर्गुणाकडे घेऊन जा. तुमच्या नामात तल्लीन होऊन आम्हाला स्वतःचाही विसर पडू दे. आपले नामसंकीर्तन आमच्या पेशीपेशींमध्ये घुमू दे. तुम्हीच आम्हाला या संसारात आणले आहे आणि या संसारातून तुम्हीच आम्हाला पुन्हा तुमच्याकडे, म्हणजे निर्गुणाकडे घेऊन जात आहात. आम्हाला संसारात राहूनही न राहिल्याप्रमाणे वाटत आहे; कारण तुम्हीच आमच्या जीवनात पूर्णपणे सामावले आहात.
हे देवा, या संसारात मी कुणाचीही नाही, ना माझे कुणी आहे. मला कशाचा मोह होऊ देऊ नकोस. मला केवळ तुमच्याकडेच यायचे आहे. हे अवधूतस्वरूप गुरुदेवा, (परात्पर गुरु डॉ. आठवले) आम्ही आता तुमच्या कृपेत समरस झालो आहोत. आपले नामसंकीर्तन करतांना आम्हाला पुष्कळ आनंद होत आहे. यासाठी आम्ही आपल्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
२. कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)
‘आता आपण याच विषयावर एक सुंदर कथा ऐकणार आहोत. ‘आपल्या जीवनात कधी कधी वाईट प्रसंग घडतात. त्यातही ईश्वरेच्छा कशी आहे ? किंवा त्या दुःखद प्रसंगात ईश्वर आपल्याला कसे साहाय्य करतो ?’, याचे भावचिंतन करत ही कथा ऐकूया.
२ अ. भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांची लीला !
२ अ १. गरीब दांपत्याच्या घरी श्री नृसिंह सरस्वती आले असतांना त्यांना भिक्षा वाढण्यासाठी घरात अन्नाचा कणही नसणे : एक गरीब दांपत्य होते. त्यांची त्यांच्या गुरूंवर अत्यंत श्रद्धा होती. त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या घराबाहेर लावलेल्या एका घेवड्याच्या वेलावर होत होता. त्यांच्याकडे धान्य घेण्यासही धन नसायचे. एकदा त्यांच्या घरी श्रीनृसिंह सरस्वती येतात. गृहस्थ त्यांच्या पत्नीला सांगतात, ‘‘पहा, कोण आले आहे ! त्यांना भिक्षा वाढ.’’ त्या वेळी त्यांच्या घरात अन्नाचा एक कणही नसतो. त्यामुळे ते दोघेही विचारात पडतात.
२ अ २. घरात अन्नाचा कण नसल्याचे श्री नृसिंह सरस्वती यांना समजल्यावर त्यांनी घरच्या अंगणातील घेवड्याचा वेल उपटून नेणे आणि त्याचे गरीब दांपत्याला अत्यंत वाईट वाटणे : दांपत्याची ही स्थिती श्री नृसिंह सरस्वती यांना समजते. ते त्यांना म्हणतात, ‘‘तुमच्या घरात अन्नाचा कण नाही, तर मी तुमच्या घरच्या अंगणातील घेवड्याचा वेल उपटून नेतो !’’ ते घेवड्याचा वेल उपटून घेऊन निघून जातात. तेव्हा या गरीब जोडप्याला अत्यंत वाईट वाटते. त्यांना ‘नृसिंह सरस्वती यांनी असे का केले ?’, असे वाटते.
२ अ ३. शेष राहिलेला घेवड्याचा वेल उपटून टाकतांना तिथे सोन्याने भरलेला एक हंडा मिळणे आणि तो पाहून त्या पती-पत्नीला आनंद होणे : ‘थोडासा राहिलेला घेवड्याचा वेल उपटून टाकूया. आता त्याचा काही उपयोग नाही’, असे वाटून ते दांपत्य वेल उपटण्यासाठी भूमी खोदू लागतात. भूमी खोदतांना त्यांना अकस्मात् तेथे सोन्याने भरलेला एक सोन्याचा हंडा मिळतो. ते पाहून दोघांना अत्यंत आनंद होतो.
२ अ ४. ‘देवाची इच्छा ही सर्वश्रेष्ठ इच्छा असून त्यात भक्ताचे कल्याणच असते’, हे कथेतून लक्षात येणे : ‘देवाची इच्छा ही सर्वश्रेष्ठ इच्छा असून त्यात भक्ताचे कल्याणच असते’, हेच या कथेतून लक्षात येते. ‘सर्वांनी ईश्वरावर श्रद्धा ठेवून प्रत्येक परिस्थिती ही त्याचीच इच्छा आहे’, असा भाव ठेवूया.
२ आ. दैवी सत्संगात सर्वांना दिलेले ध्येय : आपण दिवसभरात न्यूनतम २० वेळा दत्तगुरूंचे भावपूर्ण स्मरण करून त्यांच्या नामात तल्लीन होऊया.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २३.६.२०२२)