सोलापूर येथे पैलवानांकडून मोठ्या प्रमाणात उत्तेजक द्रव्यांचा वापर !

शासनाची माहिती !

मुंबई, २ मार्च (वार्ता.) – सोलापूर येथे आखाड्यांतील पैलवान उत्तेजनासाठी ‘मेफेन्टरमाईन सल्फेट’ या ‘इंजेक्शन’चा मोठ्या प्रमाणात अवैधपणे वापर करत असल्याची धक्कादायक माहिती अन्न आणि औषध विभागाकडून विधानसभेत देण्यात आली. अमळनेर येथील आमदार अनिल पाटील यांनी २ मार्च या दिवशी सभागृहात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.

अन्न आणि औषध विभागाकडून सोलापूर जिल्ह्यातील औषध विक्री पेढींची पडताळणी केली असता त्यामध्ये ३ पेढींमधून डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन आणि देयक यांविना ‘मेफेन्टरमाईन सल्फेट इंजेक्शन’ची विक्री करण्यात आल्याचे आढळून आले. ही विक्री आखाड्यांतील पैलवानांना मोठ्या प्रमाणात झाल्याचे या अन्वेषणात आढळून आले. या औषध विक्रीपेढींचे परवाने १ एप्रिल २०२३ पासून रहित करण्यात येणार आहेत. या प्रकरणी ४ औषधविक्री पेढींच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून सभागृहात देण्यात आली.