‘नोव्हेंबर २०२२ मध्ये मी सनदी लेखपाल अभ्यासक्रमाची दुसर्या वर्षाची (‘सी.ए. इंटरमिडीएट’ची) परीक्षा दिली. १०.१.२०२३ या दिवशी सकाळी या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाला. या परीक्षेत मी भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या असीम कृपेमुळे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आणि मला धनबाद जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त झाले. तेव्हा मला तीव्रतेने जाणीव झाली, ‘श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांनीच माझ्याकडून अभ्यास करून घेतला, परीक्षेची सिद्धता करून घेतली आणि परीक्षेच्या वेळी उत्तरेही लिहून घेतली.’ त्या वेळी प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला आलेल्या काही अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. भगवान श्रीकृष्णाने अभ्यासामध्ये साहाय्य करणे
१ अ. मी सूक्ष्मातून भगवान श्रीकृष्णाला अभ्यासाविषयीची शंका विचारत असे. त्या वेळी तो मला योग्य मार्गदर्शन करून साहाय्य करत असे.
१ आ. अभ्यास होत नसतांना श्रीकृष्णाला शरण गेल्यावर मन शांत होणे आणि ‘श्रीकृष्णामुळेच सर्वकाही शक्य होत आहे’, याची जाणीव होणे : कधी कधी माझा अभ्यास होत नसे. मला काही आकलन होत नसे. तेव्हा मी भगवान श्रीकृष्णाला शरण जायचे आणि ‘तोच मला सर्वतोपरी सांभाळत आहे’, या विचाराने माझे मन शांत व्हायचे. त्या वेळी ‘भगवान श्रीकृष्णाच्या चरणी शरणागत राहिल्यामुळेच सर्वकाही शक्य होत आहे’, याची मला जाणीव व्हायची.
२. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने साधनेचे महत्त्व लक्षात येणे
ज्या दिवशी माझे साधनेचे प्रयत्न आणि नामजपादी उपाय चांगले होत नसत, त्या दिवशी माझा अभ्यासही चांगला होत नसे. तेव्हा प.पू. गुरुदेवांच्या कृपेने साधनेचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
३. संतांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर अभ्यास करतांना व्यष्टी साधनेचेही प्रयत्न होऊ लागणे आणि अधिक आनंद मिळू लागणे
मी सनातनच्या ८१ व्या संत पू. (सौ.) सुनीता खेमकाकाकू यांना ‘अभ्यास आणि साधना यांची सांगड कशी घालावी ?’, असे विचारले. तेव्हा मला त्यांचे मागर्र्दर्शन लाभले आणि त्यानुसार चिंतन केल्यावर ‘प.पू. गुरुदेवांनीच माझा अभ्यास आणि व्यष्टी साधना यांची सांगड घालून दिली’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर माझ्याकडून ‘अभ्यास करतांनाच स्वतःतील स्वभावदोषांवर लक्ष ठेवणे, अधिकाधिक प्रार्थना करणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे’, यांसारखे प्रयत्न होऊ लागले. माझी व्यष्टी साधना चांगली होऊ लागल्यामुळे मला अभ्यास करतांना अधिक आनंद मिळू लागला. ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला हे सर्व करता येणे शक्य झाले’, यासाठी मी त्यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. नंदिता अगरवाल, कतरास, धनबाद, झारखंड. (३१.१.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |