राष्‍ट्रीय संत प.पू. वसंत विजय महाराज यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त होणार्‍या ‘श्री कोल्‍हापूर महालक्ष्मी महोत्‍सवा’स प्रारंभ !

राष्‍ट्रीय संत प.पू. वसंत विजय महाराज

कोल्‍हापूर – कृष्‍णगिरी शक्‍तीपिठाधिपती राष्‍ट्रीय संत प.पू. वसंत विजय महाराज यांच्‍या जयंतीनिमित्त सुवर्णभूमी लॉन, शिरोली पथकर नाका येथे ‘श्री कोल्‍हापूर महालक्ष्मी महोत्‍सव’ होत असून हा महोत्‍सव २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत होत आहे. सुमारे १३ एकर भूमीवर उभारण्‍यात आलेल्‍या उत्‍सवाच्‍या ठिकाणी भव्‍य कथामंडप आणि भव्‍य १०८ कुंडीय हवन यज्ञ कुटीर उभारण्‍यात आले आहे. केरळचे राज्‍यपाल आरिफ महंमद खान यांच्‍या हस्‍ते याचा प्रारंभ करण्‍यात आला. या महोत्‍सवाच्‍या निमित्ताने ५ सहस्र पंचधातूंच्‍या मूर्ती दर्शन आणि पूजन यांसाठी ठेवण्‍यात आल्‍या आहेत.

महोत्‍सवस्‍थळी उभारण्‍यात आलेली २१ फुटी श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती

१. प.पू. वसंत विजय महाराज यांच्‍या हस्‍ते सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत पूजा करण्‍यात येत असून कोणत्‍याही महिला लाल कपड्यात आणि पुरुष शुद्ध पांढर्‍या पूजेच्‍या कपड्यात सहभागी होऊ शकतात. प्रतिदिन दुपारी २ ते ४ या वेळेत महालक्ष्मी पुराणातील अमृतमयी महाकथा सांगण्‍यात येत आहे. यानंतर दुपारी ४ ते सायं. ७ या वेळेत हवन यज्ञ होत आहे. प्रतिदिन रात्री ८ ते १० या वेळेत आयोजित भजनसंध्‍येमध्‍ये प्रसिद्ध गायक लखबीर सिंग लक्‍खा त्‍यांच्‍या भजनाने भक्‍तीपूजा करणार आहेत.

२. प.पू. वसंत विजय महाराज यांच्‍या मुखातून श्री महालक्ष्मीदेवीची अमृतकथा ऐकण्‍यासाठी बांधण्‍यात आलेल्‍या भव्‍य मंडपात २१ फुटी श्री महालक्ष्मीदेवी, तसेच ९ फुटी अष्‍टलक्ष्मी, अष्‍टभैरव यांची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

३. ८ दिवस चालणार्‍या महायज्ञात २५० पंडित १ कोटी लक्ष्मी मंत्रांचा जप आणि १ लाख श्री सूक्‍तांचे पठण करतील. हा जगातील पहिला महायज्ञ आहे, ज्‍यात १ सहस्र किलो शुद्ध गायीचे तूप, १ सहस्र किलो औषधे आणि १ सहस्र किलो सुका मेवा यांचा उपयोग केला जाणार आहे.

महोत्‍सवस्‍थळी ठेवण्‍यात आलेल्‍या ५ सहस्र पंचधातुंच्‍या मूर्ती