भारताला चीनकडून व्यावसायिक क्षेत्रातील प्रामाणिकपणा शिकायला हवा ! – उद्योगपती नारायण मूर्ती

उद्योगपती नारायण मूर्ती

नवी देहली – भारताला चीनकडून व्यावसायिक क्षेत्रातील प्रामाणिकपणा  शिकण्याची आवश्यकता आहे. वर्ष १९४० पर्यंत भारत आणि चीन यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार जवळपास समान होता; पण त्यानंतर चीनचा विकास झपाट्याने झाला आणि आज त्यांची अर्थव्यवस्था भारताच्या ६ पट आहे. यामागे चीनची प्रामाणिकपणे काम करण्याची संस्कृती हे कारण आहे, असे मत ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे सहसंस्थापक एन्.आर्. नारायण मूर्ती यांनी व्यक्त केले. या वेळी ‘माझ्या या मतावरून मला देशद्रोही म्हणू नये’, असेही त्यांनी नमूद केले. ते परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘एशिया इकॉनॉमिक डायलॉग’ या कार्यक्रमाला संबोधित करत होते.

नारायण मूर्ती पुढे म्हणाले की,

१. आपल्याला जलद निर्णय घेण्याची, त्वरित कार्यवाही करण्याची, तसेच कोणत्याही समस्येविना व्यवहार, व्यवहारात प्रामाणिकपणा आणि पक्षपात न करण्याची संस्कृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

२. देशातील केवळ एक छोटासा वर्ग कठोर परिश्रम करतो आणि बहुतेक लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली संस्कृती आत्मसात केलेली नाही.

३. चीनमध्ये भ्रष्टाचार अल्प आणि प्रामाणिक लोक अधिक आहेत. व्यावसायिकांनी केवळ भारतातच रहावे आणि भारतातच सर्व काही करावे, असे वाटत असेल, तर व्यवसायाच्या संदर्भात निर्णय जलद घेतले जावेत.