राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

  • ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण

  • गुंड आणि भ्रष्टाचारी यांचा भरणा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष !

कोल्हापूर – संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी, तसेच इतर लोकांना ‘भागभांडवल देतो’, असे सांगून त्यांची ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी कागल येथील विवेक कुलकर्णी यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.

विवेक कुलकर्णी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मुश्रीफ यांनी वर्ष २०१२ मध्ये कारखाना उभारणीसाठी सभासद आणि भागधारक होण्याचे आवाहन केले. त्यातून लोकांकडून १० सहस्र रुपयांप्रमाणे भागभांडवल घेतले. ‘यातील सभासदांना प्रत्येक मासाला ५ किलो साखर, तसेच लाभांश रूपात अन्य आर्थिक लाभ मिळतील’, असे सांगण्यात आले. कारखाना चालू झाल्यावर विवेक कुलकर्णी, तसेच अन्य कुणासही कोणतीही पावती किंवा ‘शेअर सर्टिफिकेट’ देण्यात आले नाही. त्यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांना सरसेनापती शुगर ‘एल्.एल्.पी.’ या नावाने केवळ पोचपावत्या देण्यात आल्या. यात आमची फसवणूक झाली आहे.

मुश्रीफ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आणि संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या काही सभासदांनी याविरोधात मुरगूड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. हसन मुश्रीफ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई चालू आहे. ‘या षड्यंत्रामुळे कोल्हापुरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास संपूर्ण दायित्व प्रशासनाचे असेल’, अशी चेतावणी मुश्रीफ यांच्या समर्थकांनी दिली आहे. (अशी धमकी देणार्‍यांवरही पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)