कोर्लई (जिल्हा रामनाथ (अलिबाग)) येथील कथित बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद

भाजप नेते किरीट सोमय्या

रामनाथ (अलिबाग) – मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर (आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी) यांच्या नावावर असलेल्या जागेतील कथित १९ बंगल्यांच्या घोट्याळ्याच्या प्रकरणी येथील ग्रामपंचायत अधिकारी, तत्कालीन सरपंच, सदस्य यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बंगल्यांच्या नोंदीमध्ये खाडाखोड करण्याविषयी हा गुन्हा येथील ग्रामविकास अधिकारी संगीता भांगारे यांनी केलेल्या तक्रारीनुसार नोंद झाला आहे. या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत वारंवार आरोप केले आहेत. आर्किटेक्ट कै. अन्वय नाईक यांच्याकडून वर्ष २०१४ मध्ये ही भूमी खरेदी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या ९ एकर जागेत २ मोडकी घरे, वाढलेले गवत आदी आहे; मात्र १९ बंगले कुठे दिसत नाहीत. या संदर्भात ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, ‘स्वतःकडे असले की, धुतल्या तांदळासारखे आणि दुसर्‍याकडे गेले की तांदळातील खडे’ याप्रमाणे हे आहे.