पुणे येथे ‘जी-२० फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ व्याख्यानमाला
पुणे – ‘मेरा भारत महान’ वगैरे जयघोषाने काहीही होणार नाही. भारताला आर्थिकदृष्ट्या शक्तीशाली करण्यासाठी प्रत्येक भारतियाने कठोर परिश्रम करून वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणाचा अंगीकार करावा, हा एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे संस्थापक श्री. नारायण मूर्ती यांनी केले. ते सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापिठाच्या वतीने ‘जी-२० फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ या व्याख्यानमालेत बोलत होते.
ते म्हणाले की, उद्योजक म्हणून प्रतिष्ठा मिळवल्यास ग्राहक तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येतो. गुंतवणूकदारांमध्ये प्रतिष्ठा मिळाल्यास मोठी आणि दीर्घकालीन गुंतवणूक मिळते. सरकारसाठी काम करतांना अनैतिक गोष्टींना बळी पडावे लागत नाही. सातत्यपूर्ण कामाचे रूपांतर सत्तेत करता येते. समस्या सोडवण्याचे शिक्षण प्राथमिक शिक्षणापासून दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण होईल.