जळगाव येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर यांनी पतीच्या आजारपणात अनुभवलेली अपार गुरुकृपा !

श्री. प्रशांत जुवेकर

१. श्री. प्रशांत यांची प्रकृती अकस्मात् बिघडणे

१ अ. श्री. प्रशांत यांना प्रसारसेवेत असतांनाच अकस्मात् चक्कर येणे : ‘श्री. प्रशांत बांधकामाची सेवा, संपर्क सेवा किंवा अन्य अनेक प्रशासकीय सेवा यांसाठी नेहमी एकटेच जातात; मात्र १.२.२०२२ या दिवशी गुरुकृपेने त्यांच्या मनात विचार आला, ‘एका साधकाला समवेत घेऊन जाऊया.’ तेव्हा त्यांनी एका साधकाला समवेत घेतले. त्या दिवशी प्रसारसेवेत असतांनाच त्यांना अकस्मात् चक्कर आली.

१ आ. श्री. प्रशांत यांच्या हृदयाचे शस्त्रकर्म करावे लागणार असल्याचे कळणे : साधकांनी श्री. प्रशांत यांना तिथून जळगाव सेवाकेंद्रात आणले. त्यानंतर त्यांची ‘टू डी एको’ (2d echo) चाचणी (टीप) केली. तेव्हा ‘त्यांच्या हृदयाच्या एका झडपेमध्ये बिघाड झाला असून हृदयाची ती झडप (व्हाल्व) पालटण्याचे शस्त्रकर्म करावे लागणार आहे’, असे समजले.

टीप – या चाचणीमध्ये ध्वनीलहरींच्या साहाय्याने हृदयाचे कार्य प्रत्यक्ष पाहिले जाते. त्या योगे हृदयातील झडपा, हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिन्या आणि हृदयातून होणारे रक्ताभिसरण तपासले जाते.

२. श्री. प्रशांत यांच्या हृदयाच्या शस्त्रकर्मासाठी नाशिकला पोचल्यावर साधिकेला झालेले त्रास !

सौ. क्षिप्रा जुवेकर

२ अ. नाशिकला पोचल्यावर साधिकेच्या पोटात वेदना होणे आणि उलटी आल्यासारखे वाटून ताप येणे : शस्त्रकर्म करण्यासाठी श्री. प्रशांत यांना नाशिकला न्यावे लागणार होते. १.४.२०२२ या दिवशी आम्ही जळगावहून नाशिकला आलो. हा एवढा मोठा (२५० कि.मी.चा) प्रवास श्री गुरूंच्या कृपेने थकवा न येता पार पडला; परंतु आम्ही नाशिकला साधकाच्या घरी पोचल्यावर अकस्मात् माझ्या पोटात वेदना होऊ लागल्या. माझे हातपाय थंड पडू लागल्यामुळे मी घाबरले. मला उलटी आल्यासारखे वाटू लागले आणि तापही आला.

२ आ. ऐनवेळी स्वतःची प्रकृती बिघडल्यामुळे मनात विचारांचे काहूर माजणे, मृत्यूची स्पंदने जाणवून भीती वाटणे आणि त्या वेळी चित्त गुरुस्मरण करत असल्याचे जाणवणे : त्या वेळी माझ्या मनात विचार आले, ‘आता या स्थितीत माझी प्रकृती बिघडली, तर यजमानांचे शस्त्रकर्म कसे करणार ? आणि केले, तरी मी धावपळ कशी करू शकणार ? माझ्यामुळे शस्त्रकर्म पुढे ढकलले जाता कामा नये.’ मला पुढचे भीतीदायक चित्र दिसू लागले. मला एक वेगळाच उदासपणा जाणवून भीती वाटू लागली. मी मनातून पुष्कळ घाबरले होते; कारण मला मृत्यूची स्पंदने जाणवत होती, तरीही त्याच वेळी माझे चित्त गुरुस्मरण करत होते.

३. देवावर श्रद्धा असलेल्या आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करणे

आम्ही डॉ. राहुल कैचे या आधुनिक शस्त्रकर्म तज्ञांकडे (‘कार्डियाक सर्जन’कडे) गेलो. हृदयाची झडप पालटून दुसरी झडप लावण्याच्या शस्त्रकर्मामध्ये (‘व्हाल्व रिप्लेसमेंट सर्जरी’मध्ये) त्यांचे नाव सुप्रसिद्ध असून ते नेहमी अत्यंत व्यस्त असतात. त्यांना साधनेचीही आवड आहे. त्यांनी त्यांच्या चिकित्सालयातील देवघरात पंचमुखी हनुमानाचे अतिशय सुंदर चित्र लावले आहे. आम्ही त्यांना भेटल्यावर त्यांनी आमच्याकडून आश्रम आणि साधना यांविषयी जाणून घेतले. ते म्हणाले, ‘‘मी शस्त्रकर्म तज्ञ असलो आणि मी शस्त्रकर्म करणार असलो, तरीही प्रत्यक्ष सर्वकाही करणारा तो भगवंतच आहे !’’ त्यानंतर श्री. प्रशांतयांचे हृदयाचे शस्त्रकर्म अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडले.

४. शस्त्रकर्मानंतर ५ दिवसांनी श्री. प्रशांत पुन्हा बेशुद्ध होणे 

श्री. प्रशांत यांच्या हृदयाचे शस्त्रकर्म यशस्वीपणे पार पडले आणि ५ दिवसांनंतर त्यांना अतीदक्षता विभागातून बाहेरच्या खोलीत आणण्यात आले; पण तेव्हा मला चांगले वाटत नव्हते. दुपारी श्री. प्रशांत यांची प्रकृती अकस्मात् बिघडली. ते स्नान करत असतांना स्नानगृहातच बेशुद्ध पडले. आधुनिक वैद्यांच्या एक गटाने श्री. प्रशांत यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना शुद्ध आली. त्यामुळे पुन्हा २ दिवस त्यांना अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले.

५. श्री. प्रशांत यांना होणारे त्रास संतांना सांगितल्यावर त्यांनी नामजपादी उपाय करणे 

ज्या दिवशी श्री. प्रशांत पुन्हा बेशुद्ध झाले, त्या दिवशी ‘सूक्ष्मातून भयंकर युद्ध झाले’, असे मला जाणवले. तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी स्वतः श्री. प्रशांत यांच्यासाठी नामजप केला आणि अन्य संतांनाही नामजप करायला सांगितला. तेव्हा श्री. प्रशांत यांना अतीदक्षता विभागात ठेवले होते. त्यांना भेटण्यासाठी दिवसातून केवळ दोनदा ५ मिनिटांसाठी आत जाता येत होते; परंतु ‘त्यांच्या मनात कोणते विचार चालू आहेत ? त्यांना काय त्रास होत आहे ?’, हे मला बाहेर बसूनही अनुभवता येत होते. मी ते संतांना सांगितल्यावर संत त्यावर नामजपादी उपाय करायचे.

६. या प्रसंगात अनुभवलेली अपार गुरुकृपा !

या घटनेच्या मागे कुठलेही शारीरिक कारण नव्हते. तेव्हा मला जाणवले, ‘जणू प्रत्यक्ष काळच श्री. प्रशांत यांना घेऊन जाण्यासाठी आला होता; परंतु गुरुदेवांनी त्याला रिक्तहस्ते परत पाठवले. श्री गुरूंनी श्री. प्रशांत यांच्याभोवती अभेद्य संरक्षक कवच निर्माण करून त्यांना जणू पुनर्जन्मच दिला.’ खरोखर हा त्यांचा पुनर्जन्मच होता. त्या दिवशी केवळ गुरुकृपाच माझ्या यजमानांना साक्षात् मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप परत घेऊन आली.

त्या वेळी ‘श्री. प्रशांत यांच्या हृदयाचे शस्त्रकर्म होण्यापूर्वी मला उदास आणि दुःखी का जाणवत होते ?’, ते माझ्या लक्षात आले. श्री. प्रशांत यांच्यावर साक्षात् मृत्यूचेच संकट आले होते. त्या संकटाचा सूक्ष्म प्रभाव माझ्यावर झाल्यामुळे मला उदासपणा आला होता.

७. कृतज्ञता

श्री गुरूंची साधकांवर एवढी कृपा आहे की, आमच्या जीवनात कितीही त्रास आणि संकटे आली, तरी त्याची थोडीशीही झळ श्री गुरु आम्हाला लागू देत नाहीत. साधकांवर संकट येण्यापूर्वीच श्री गुरु ती संकटे दूर करतात आणि आपल्या प्राणप्रिय साधकांना आनंदच आनंद देतात. धन्य आहे ती गुरुमाऊली !

‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, म्हणजे गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते’, हे वाक्य प्रत्येक साधकाला ठाऊक आहे; मात्र ‘श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या कृपेचे वर्णन कसे आणि किती करावे ?’, हाच प्रश्न आहे; कारण ते वर्णन करायला शब्दच अपुरे पडतात. मनात केवळ कृतज्ञता दाटून येते.

८. प्रार्थना

‘श्रीविष्णुरूपी गुरुदेव अत्यंत कृपाळू आहेत’, याची आम्हा साधकांना क्षणोक्षणी प्रचीती येत आहे. ‘माझ्या भक्तांचा नाश होत नाही’, असे भगवान श्रीकृष्णाचे वचन आहे. आमचे श्री गुरु साक्षात् श्रीकृष्णच आहेत. ते प्रीतीचा महासागर आहेत. ते एवढे प्रीतीमय आहेत की, ते आमच्यासारख्या सामान्य साधकांनी भक्त होण्याची वाट पहात नाहीत. माझी त्यांच्या श्री चरणी केवळ एवढीच प्रार्थना आहे, ‘आपणच आम्हाला भक्त बनवून आपल्या श्री चरणी संपूर्णपणे समर्पित करून घ्यावे.’

– सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के,  जळगाव (४.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक