सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘वाढदिवस’ या शब्‍दाचा सूक्ष्मातून सांगितलेला अर्थ !

साधकांना साधनापथावर मार्गदर्शन करणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आश्विन कृष्‍ण षष्‍ठी (२७.१०.२०२१) या दिवशी माझा वाढदिवस होेता. त्‍या दिवशी सकाळी उठल्‍यावर मी सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी नमस्‍कार केला. त्‍या वेळी परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपेमुळेच माझे त्‍यांच्‍याशी सूक्ष्मातून अनुसंधान साधले गेले. तेव्‍हा आमच्‍यात पुढील संभाषण झाले.

अश्‍विनी अनंत कुलकर्णी

मी : गुरुदेव, आज माझा वाढदिवस आहे.

परात्‍पर गुरुदेव : ‘वाढदिवस’ या शब्‍दाचा अर्थ तुला ठाऊक आहे का ?

(या प्रश्‍नाचे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उत्तर ठाऊक नसल्‍याने मी गप्‍प बसले.)

परात्‍पर गुरुदेव : ‘मागील वर्षीच्‍या वाढदिवसापासून आजपर्यंत स्‍वतःची व्‍यष्‍टी आणि समष्‍टी सेवा ईश्‍वराशी जोडण्‍याच्‍या प्रयत्नांत किती वाढ झाली ?’, याचा आढावा घेण्‍याचा दिवस म्‍हणजे वाढदिवस ! आज तुझा वाढदिवस आहे, तर तू काल असा आढावा घेतलास का ?

मी खाली मान घालून उभी राहिले; कारण मी माझ्‍या व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधनेचा आढावा घेतला नव्‍हता. याउलट माझ्‍यातील ‘अल्‍पसंतुष्‍टता’ या स्‍वभावदोषामुळे ‘माझ्‍याकडून किती चांगले प्रयत्न झाले ? मला काय काय छान जमले ?’, असेच विचार माझ्‍या मनात येत होते.

परात्‍पर गुरुदेव : ‘व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना करत असतांना आपली कृती ईश्‍वराशी जोडण्‍यात किती वाढ झाली ?’, याचा आढावा घेण्‍याचा दिवस म्‍हणजे ‘वाढदिवस !’ असे करत ईश्‍वराशी सतत जोडले जाणे, हेच तुझे या आणि इथून पुढे होणार्‍या सर्व वाढदिवसांचे ध्‍येय असेल. असे प्रयत्न करशील ना ?

मी : हो.

सूक्ष्मातून झालेल्‍या आमच्‍या या संभाषणानंतर ‘माझ्‍याकडून असे प्रयत्न झाले नाहीत’, याविषयी मला खंत वाटली; परंतु परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपेने माझ्‍या मनात नकारात्‍मक विचार आले नाहीत आणि मी निराशही झाले नाही. गुरुदेवा, आपण दिलेले हे ध्‍येय आपणच माझ्‍याकडून पूर्ण करून घेणार आहात. ‘केवळ माझेच नाही, तर माझे सर्व गुरुबंधू आणि भगिनी यांचेही हे ध्‍येय तुम्‍हीच पूर्ण करून घेणार आहात’, असा विचार माझ्‍या मनात आला.

या अनुभूतीमुळे मी, माझे सर्व गुरुबंधू आणि भगिनी यांना ईश्‍वराशी जोडण्‍याचा संकल्‍प करणारे, आम्‍हा सर्वांचा योगक्षेम वहाणारे आणि वात्‍सल्‍याचे मूर्तीमंत रूप असलेले परात्‍पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्‍या चरणी मला कृतज्ञता वाटली आणि माझी पुष्‍कळ भावजागृती झाली.’

– अश्‍विनी अनंत कुलकर्णी, ढवळी, फोंडा, गोवा. (१०.११.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक