भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील मुख्य उद्योग म्हणून आजही शेती व्यवसायाकडे पाहिले जाते. भारताचे जलद गतीने औद्योगिकरण होत असले, तरी देशातील शेती भारतियांचे भरण-पोषण करण्यास अजून तरी समर्थ आहे. ‘वाढत्या औद्योगिकरणामुळे भविष्यात शेती व्यवसाय धोक्यात येतो कि काय ?’, असा प्रश्न सामान्यांना पडतो. उध्वस्त होत चाललेली एकत्र कुटुंबव्यवस्था, उदासीन सरकारी धोरणे, खासगी सावकारी, शेतकर्यांच्या आत्महत्या, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे खासगीकरण, पारंपरिक शेतीला आधुनिक उपकरणांची जोड देण्यास अल्प पडत असलेले शेतकरी बांधव अशा एक ना अनेक समस्या या कृषीप्रधान देशात आजही भेडसावत आहेत.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ५५० हून अधिक विद्यार्थ्यांनी राहुरी (नगर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, दापोली (रत्नागिरी) येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या चारही कृषी विद्यापिठांसमोर रात्रंदिवस धरणे आंदोलन केले होते. हे विद्यार्थी येणार्या काळात शेतीला अभियांत्रिकीची जोड मिळावी आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी संघर्ष करत आहेत. या आंदोलनात मुलींची संख्या लक्षणीय होती. या आंदोलनाच्या वेळी १२० हून अधिक विद्यार्थी आजारी पडले, ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी मुंडन करून घेत सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचा निषेध व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यामागे त्यांच्या काही प्रमुख मागण्या होत्या. त्यात प्रामुख्याने ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षे’ला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय पूर्ववत् करण्यात यावा, महाराष्टासाठी स्वतंत्र ‘कृषी अभियांत्रिकी संचालनालय’ स्थापन करावे, मृद आणि जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना पात्र करून अभियंत्यांची तात्काळ भरती प्रक्रिया राबवण्यात यावी’, या मागण्यांचा समावेश आहे. कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वसमावेशक विचार करून योग्य निर्णय घ्यावे, असे वाटते. जेणेकरून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची हेळसांड थांबेल, हे निश्चित !
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा