१. यजमानांना नोकरी नसल्यामुळे घरामध्ये तणाव निर्माण होणे
‘माझे यजमान अधिवक्ता असून ते एका ज्येष्ठ अधिवक्त्यांकडे नोकरी करत होते. नोकरी करत असतांना यजमानांना पुष्कळ ताण यायचा. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली; पण त्यानंतर लगेच दुसरी नोकरी मिळत नव्हती. त्याच वेळी आमचे घर बांधण्याचे काम चालू होते. त्यामुळे पुष्कळ व्यय होत होता. आमच्याकडे दुसरी एक सदनिका होती; पण ती विकली जात नव्हती. हे सर्व कोरोनाच्या कालावधीत घडत होते. त्यामुळे घरामध्ये सतत तणावाचे वातावरण होते.
२. यजमानांना परिस्थिती स्वीकारणे कठीण जात असल्याने साधिकेला त्यांचा राग येणे, एका संतांना मनाची स्थिती सांगितल्यावर तिला राग येण्याचे प्रमाण उणावणे
गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मुलाला नोकरी लागली, तरीही आम्हाला आर्थिक चणचण भासत होती. यजमान परिस्थितीला दोष देत होते आणि ‘याला मी कारणीभूत आहे’, असे म्हणत होते. त्यामुळे मला त्यांचा राग यायचा. त्या वेळी ‘परिस्थिती स्वीकारण्यासाठी देव आपल्याला घडवत आहे’, हे माझ्या लक्षात आले. आरंभी मी यजमानांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना परिस्थिती स्वीकारता येत नव्हती. ६ – ७ मासांनंतर मी त्यांना समजावणे सोडून दिले. देवाच्या कृपेने मी एका संतांना माझ्या मनाची स्थिती सांगितल्यावर मला राग येण्याचे प्रमाण उणावले. त्यानंतर मला ‘त्या परिस्थितीतही साधनेचे कोणते प्रयत्न करायचे ?’ यावर लक्ष केंद्रित करता आले.
३. सेवारत राहिल्याने अनावश्यक विचारांवर मात करता येणे आणि ‘देवच परिस्थितीतून बाहेर काढणार आहे’, अशी श्रद्धा वाढणे
मी घरातील परिस्थितीचा विचार करण्यापेक्षा ‘सेवा कशी करता येईल ?’ याकडे लक्ष दिले. त्यानंतर माझ्या यजमानांनी स्वतः वकिली करण्यास आरंभ केला. गुरुदेवांच्या कृपेने या कठीण काळात कोणतीही अडचण भासली नाही. मी सेवारत राहिल्यामुळे मला अनावश्यक विचारांवर मात करता आली आणि सेवेतून आनंद घेता आला. ‘आपण साधनारत राहिल्यावर देव आपली काळजी घेतो’, असे मला शिकायला मिळाले आणि ‘या परिस्थितीतून देवच आपल्याला बाहेर काढणार आहे’, ही श्रद्धा वाढली.
४. ‘प्रत्येकाची साधनेची वेळ यावी लागते’, असे एका साधकाने सांगितल्यावर अंतर्मुखता वाढून स्वतःतील स्वभावदोष लक्षात येऊ लागणे
त्या कालावधीत यजमानांचे साधनेचे प्रयत्न अल्प होत होते. एका शिबिरामध्ये श्री. नागेश गाडे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी याविषयी सांगितले, ‘‘प्रत्येकाची साधनेची वेळ यावी लागते आणि तेव्हाच साधनेचे प्रयत्न होतात.’’ तेव्हापासून माझ्या मनातील काळजीचे विचार निघून गेले. ‘गुरुदेवांचे सर्वांकडे लक्ष आहे’, अशी श्रद्धा ठेवून मी स्वतःच्या साधनेवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे माझी अंतर्मुखता वाढून मला माझ्यातील स्वभावदोष लक्षात येऊ लागले. मला आत्मविश्वासाने आणि श्रद्धापूर्वक सेवा करता आली. ही केवळ आणि केवळ गुरुदेवांचीच कृपा आहे.’
– एक साधिका (१४.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |