सातारा, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – खासगी सावकारीच्या माध्यमातून लहान मुलीला ओलीस ठेवणार्या ३ जणांना सातारा जिल्ह्यातून २ वर्षांकरता तडीपार करण्यात आले.
संजय बाबर, अश्विनी संजय बाबर आणि संकेत राजे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारीचा गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. वेळोवेळी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही कोणताही परिणाम होत नव्हता. एवढे होऊनही त्यांनी सावकारीच्या माध्यमातून एका लहान मुलीला ओलीस ठेवले. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी नागरिकांनी केली. (संबंधित गुन्हेगारांवर पहिल्याच गुन्ह्याच्या वेळी कठोर कारवाई केली असती, तर आज ही वेळ आली नसती. आता नागरिकांनाच कडक कारवाईची मागणी करावी लागणे, हे पोलीस प्रशासनास लज्जास्पद आहे. – संपादक) याची नोंद घेऊन सातारा शहर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तडीपार प्राधिकरण यांच्याकडे संबंधित तिघांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावावर निर्णय घेत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तिघांनाही २ वर्षांकरता सातारा जिल्ह्यातून तडीपार केल्याचे आदेश पारित केले. नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत एकूण ९ जणांना सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.