काँग्रेसने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय शिवरात्री महोत्सवात ‘अल्लाह हू’चे गाणे !

  • हिमाचल प्रदेशमध्ये संतापजनक प्रकार !

  • भाजपने केला निषेध !

मंडी (हिमाचल प्रदेश) – येथे आयोजित आंतरराष्ट्रीय शिवरात्री महोत्सवाच्या प्रथमदिनी म्हणजे १९ फेब्रुवारी या दिवशी व्यासपिठावरून ‘साबरी ब्रदर्स’ नावाच्या सुफी कलाकारांनी ‘अल्लाह हू’ नावाचे गाणे गायले. या वेळी बिलासपूरच्या राखी गौतम नावाच्या एका गायिकेनेही हिंदी चित्रपटांतील काही अश्‍लील गाणी म्हटली. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू हेही उपस्थित होते. या एकूण प्रकारावर महोत्सवाचे आयोजन करणार्‍या काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेश सरकारचा भाजपने निषेध नोंदवला आहे, तसेच सामाजिक माध्यमांतूनही हिंदू याचा विरोध करत आहेत.

हिमाचल प्रदेशच्या भाजपच्या कार्यालयाने या प्रकाराच्या विरोधात ट्वीट करत म्हटले आहे की, निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसी नेत्यांनी म्हटले होते की, आम्ही हिंदुत्वाचा पराभव केला आहे. हे कृत्य त्याचीच साक्ष आहे का ? ज्या देवभूमीला ‘छोटी काशी’ म्हटले जाते, ज्या राज्याची ९७ टक्के लोकसंख्या ही हिंदूंची आहे, तेथील ‘शिवरात्री महोत्सवा’त ‘अल्लाह हू’ची कव्वाली गायला लावून काँग्रेस काय सिद्ध करू इच्छिते ? भाजपने स्पष्ट केले आहे की, आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही; परंतु हिंदूंच्या महोत्सवाच्या व्यासपिठावरून असा प्रकार करणे अयोग्य आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या काँग्रेसने हिंदूंची क्षमा मागावी, अशी मागणीही भाजपने केली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याची काँग्रेसची ही जुनीच खोड आहे.  नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाल्याने तेथे काँग्रेस सरकारकडून हिंदु धर्मावर असेच आघात होत राहिल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !