|
पणजी, २० फेब्रुवारी (वार्ता.) – आधुनिकतेच्या आधारावर राष्ट्रवाद आणि अध्यात्मवाद भक्कम करणार्या पाठ्यक्रमामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. ‘पतंजलि योग ट्रस्ट’चे ‘भारतीय शिक्षा (शिक्षण) मंडळ’ विद्यार्थ्यांमध्ये सनातन संस्कृतीचा गौरव निर्माण करून त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे, असे उद्गार योगऋषी रामदेवबाबा यांनी केले. गोवा शासनाच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात २० फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग यांच्यासाठी योगऋषी रामदेवबाबा यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सहस्रो विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
योगऋषी रामदेवबाबा पुढे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी योगासने शिकून शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक या दृष्टींनी सुदृढ होऊन त्यांचे आत्मबळ वाढवले पाहिजे. ‘शाळेत प्रार्थनेच्या वेळी ‘ॐ’ म्हणणे आणि आठवड्यातून एकदा सूर्यनमस्कार घालणे’, असा प्रस्ताव मी सरकारसमोर ठेवणार आहे. भारताचा संपूर्ण जगात गौरव होईल, असे आत्मबळ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजे. आपल्या आत्म्यामध्ये अनंत शक्ती आहे आणि ती शक्ती योगामुळे जागृत होत असते. शैक्षणिक धोरणामध्ये पालट करण्यासाठी आम्ही मोठे आंदोलन छेडले आहे. आपणास ‘आधुनिक शिक्षणाबरोबरच आत्मगौरव वाढेल’, अशा शिक्षणाची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना वैदिक गणित, वैदिक विज्ञान, वैदिक भौतिक विज्ञान शिकवले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी या विषयांवर सखोल ज्ञान उपलब्ध करून ठेवलेले आहे. या शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान ओतप्रोत भरून वाहू लागेल. विद्यार्थ्यांच्या मूलभूत आवश्यकता ओळखून त्यानुसार त्यांना शिक्षण दिले पाहिजे.’’
आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना योगासने शिकवणे बंधनकारक करण्याचा विचार !- मुख्यमंत्री डॉ. सावंतयाप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही योगाविषयी माहिती मिळावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. योगऋषी रामदेवबाबा गेले ३ दिवस गोव्यात आहेत आणि त्यांच्या मिरामार येथील योग शिबिराला १५ सहस्रांहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली आहे. गोवा योगमय झाले आहे. राज्यात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ लागू केले जाणार आहे. केंद्राच्या ‘फिट इंडिया’ धोरणामुळे शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित योगासने करणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना योगासने शिकवणे बंधनकारक करण्याचा विचार आहे. यासाठी जातीभेद किंवा धर्मभेद न बाळगता केवळ आपले आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी नियमित योगासनांचा अभ्यास केला पाहिजे.’’ |
पुढील ५ वर्षांत पतंजलीची वार्षिक उलाढाल ५ लाख कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट ! – योगऋषी रामदेवबाबामाझा जन्म साध्या शेतकरी कुटंबात झाला. आज ‘पतंजलि’ची वार्षिक उलाढाल ४० सहस्र कोटी रुपयांची आहे. पुढील ५ वर्षांत ‘पतंजलि’ची वार्षिक उलाढाल ५ लाख कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट आहे. भारतमातेला वैभवशाली बनवण्यासाठी हा प्रयत्न आहे. मला पैशांची आवश्यकता नाही आणि मला अन्य काहीही नको. माझे अधिकोषात खातेही नाही. मला भारताची आर्थिक शक्ती वाढवायची आहे, असे मत योगऋषी रामदेवबाबा यांनी या वेळी व्यक्त केले. |
गोव्याला योगभूमी बनवण्यासाठी गोवा सरकारचा पतंजली आयुर्वेद योगपिठासमवेत सामंजस्य करार
पणजी, २० फेब्रुवारी (वार्ता.) – गोव्याला योगभूमी बनवण्यासाठी गोवा सरकारने ‘पतंजलि आयुर्वेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्णजी यांच्याशी विविध क्षेत्रांत संयुक्तपणे काम करण्यासाठी करार केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘गोवा सरकारने ‘पतंजलि आयुर्वेद योगपिठा’समवेत कृषी, फुलशेती, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, ग्रामीण विकास, कृषी आणि पर्यावरण ‘वेलनेस’ पर्यटन आणि ‘डेअरी’ व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये संयुक्तपणे काम करण्यासाठी सामंजस्य करार (एम्.ओ.यु.) केला आहे.’’