महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिला भरतनाट्यम् नृत्‍याच्‍या मध्‍यमा पूर्ण (पाचव्‍या) परीक्षेत ‘विशेष योग्‍यता’ श्रेणी प्राप्‍त !

कु. अपाला औंधकर हिची नृत्‍य करतांनाची एक भावमुद्रा

‘मी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या मार्गदर्शनानुसार नृत्‍याच्‍या माध्‍यमातून साधना करत आहे, तसेच मी रत्नागिरी येथील ‘साईश्री नृत्‍य कलामंदिर’ या संस्‍थेच्‍या संस्‍थापिका सौ. मिताली भिडे यांच्‍याकडे गेल्‍या ७ वर्षांपासून भरतनाट्यम् शिकत आहे. वर्ष २०२१ च्‍या नोव्‍हेंबर-डिसेंबरच्‍या सत्रात माझी गांधर्व महाविद्यालयाची भरतनाट्यम् नृत्‍याची ‘मध्‍यमा पूर्ण (पाचवी)’ परीक्षा होती. कोरोना महामारीमुळे ही परीक्षा पुढे गेली आणि वर्ष २०२२ च्‍या फेब्रुवारी मासात लेखी आणि मार्च मासात प्रत्‍यक्ष नृत्‍याची परीक्षा झाली. या परीक्षेत मला ‘विशेष योग्‍यता’ श्रेणी प्राप्‍त झाली. माझे आध्‍यात्मिक गुरु आणि सनातन संस्‍थेचे संस्‍थापक परात्‍पर गुरु डॉ. आठवले अन् माझ्‍या नृत्‍यातील गुरु सौ. मिताली भिडे यांच्‍यामुळेच मला हे यश मिळाले. मला परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपेमुळेच ‘आध्‍यात्मिक स्‍तरावर नृत्‍य कसे करायचे ?’, हे शिकता आले. त्‍यासाठी त्‍यांच्‍या चरणी पत्ररूपाने हे कृतज्ञतापुष्‍प अर्पण करत आहे.

‘सनातन प्रभात’मध्‍ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्‍या प्रसिद्ध झालेल्‍या छायाचित्रांचा आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ करून घ्‍या !

‘सनातन प्रभात’मध्‍ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. प्रसिद्ध झालेल्‍या त्‍या छायाचित्रांकडे पाहून साधकांना ‘नामजप चालू होणे, भाव जागृत होणे, चैतन्‍य जाणवणे, प्रकाश जाणवणे, थंडावा जाणवणे, मन निर्विचार होणे, शांत वाटणे’, यांच्‍यापैकी काही अनुभूती आल्‍यास त्‍यांनी ‘सनातन प्रभात’चा तो अंक स्‍वतःकडे संग्रही ठेवावा. साधकांनी अनुभूती आलेल्‍या त्‍या छायाचित्राकडे बघून नामजप करावा. अशा प्रकारे साधकांनी ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध झालेल्‍या दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्‍या छायाचित्रांचा आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ करून घ्‍यावा.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

कु. अपाला औंधकर

प्रति,

परात्‍पर गुरुदेव,

आपल्‍या चरणी या लहान जिवाचा शिरसाष्‍टांंग नमस्‍कार.

१. नृत्‍याच्‍या ‘मध्‍यमा पूर्ण’ या परीक्षेत ‘विशेष योग्‍यता’ श्रेणी प्राप्‍त होणे, ही केवळ गुरुकृपाच असणे

गुरुदेव, केवळ तुमच्‍याच कृपेमुळे मला नृत्‍याच्‍या ‘मध्‍यमा पूर्ण’ या परीक्षेत ‘विशेष योग्‍यता’ श्रेणी प्राप्‍त झाली आहे. यात माझे काहीच कर्तृत्‍व नसून हे यश, म्‍हणजे तुम्‍ही प्रत्‍येक क्षणी माझ्‍यावर केलेला कृपावर्षाव आहे. मला प्राप्‍त झालेली ही विशेष श्रेणी आणि माझे सर्व काही तुमच्‍या चरणी अर्पण करून कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.

२. नृत्‍याच्‍या लेखी परीक्षेच्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती

२ अ. नृत्‍याची लेखी परीक्षा देतांना आपोआप उत्तरे लिहिली जाणे आणि तेव्‍हा ‘हे सर्व गुरुकृपेने होत आहे’, असे जाणवणे : नृत्‍याच्‍या लेखी परीक्षेच्‍या वेळी ‘पेपर’ लिहितांना मी निर्विचार स्‍थिती अनुभवत होते. मला ‘मी काय लिहीत आहे ?’, हेही समजत नव्‍हते. माझ्‍या मनात एकही विचार नव्‍हता. माझ्‍याकडून जणू आपोआपच उत्तरे लिहिली जात होती. तेव्‍हा ‘हे सर्व तुमच्‍याच कृपेने होत आहे’, असे मला जाणवत होते.

२ आ. पेपर लिहितांना मला सूक्ष्मातून डमरूचा नाद ऐकू आला आणि संपूर्ण पांढरा प्रकाश दिसून शिवाचे अस्‍तित्‍व जाणवले.

२ इ. मला सूक्ष्मातून ‘साक्षात् शिव माझ्‍याकडून हा ‘पेपर’ लिहून घेत आहे. मी जी काही उत्तरे लिहीत आहे, ते त्‍याचेच ज्ञान आहे’, असे मला जाणवले.

२ ई. ‘पेपर’ लिहून पूर्ण झाल्‍यावर मला पुष्‍कळ हलकेपणा जाणवत होता.

गुरुदेव, केवळ आपल्‍याच कृपेमुळे मला या ‘पेपर’मध्‍ये १०० पैकी ८४ गुण प्राप्‍त झाले.

३. नृत्‍याच्‍या प्रायोगिक (प्रॅक्‍टिकल) परीक्षेच्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती

३ अ. प्रायोगिक परीक्षेच्‍या वेळी मी सूक्ष्मातून शिव आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांनाच परीक्षेच्‍या ठिकाणी घेऊन गेले होेते. मला तिथे शिव आणि गुरुदेव दोघांचेही अस्‍तित्‍व अनुभवता येत होते.

३ आ. परीक्षकांनी नृत्‍याचे पुष्‍कळ कौतुक करणे : मी परीक्षकांसमोर ‘तिल्लाना’(टीप) हा नृत्‍य प्रकार सादर करून दाखवला. ते परीक्षक माझ्‍या नृत्‍यगुरूंना (सौ. मिताली भिडे यांना) म्‍हणाले, ‘‘ही किती सुंदर नृत्‍य करत आहे ! फारच छान !’’ परीक्षक सहजासहजी अशी प्रशंसा कधीच करत नाहीत; परंतु त्‍यांनी माझी प्रशंसा केली, म्‍हणजे निश्‍चितच ईश्‍वराच्‍याच गुणांचे कौतुक केले.

टीप : तिल्लाना – भरतनाट्यम् नृत्‍यातील हे एक ‘शुद्ध नृत्त’ (शरिराच्‍या मोहक हालचालींद्वारे तालाचे सादरीकरण करणे) आहे. यात ‘नोम्, तोम्, दिरना, तननम्’, अशा प्रकारचे बोल एकत्र करून त्‍यांची रागात आणि तालात रचना केलेली असते.

४. कृतज्ञता

‘हे गुरुदेवा, तुमच्‍या कृपाशीर्वादामुळेच मला हेे यश मिळणे शक्‍य झाले. यात माझे काहीच नाही. ‘हे गुरुदेवा, तुम्‍हीच ही परीक्षा व्‍यवस्‍थित पार पाडून मला उत्तीर्ण केले’, यासाठी तुमच्‍या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते. गुरुदेवा, तुम्‍ही प्रत्‍येक साधकाचा भार उचलला आहे. प्रत्‍येक साधक जिवाचे अंतर्मन ओळखणार्‍या हे नारायणस्‍वरूप गुरुदेवा, मी तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– तुमचीच,

कु. अपाला औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १५ वर्षे), फोंडा, गोवा. (४.६.२०२२)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.