पू. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला संभाजी ब्रिगेडचा विरोध

संभाजी ब्रिगेडच्या विरोधात संतापाची लाट !

रायगड – आदिवासींच्या उत्कर्षासाठी झटणारे, व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे ज्येष्ठ निरूपणकार पू. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित झाला आहे. यानंतर संभाजी ब्रिगेडने त्याला विरोध केला आहे. ‘धर्माधिकारी यांना प्रदान केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारने मागे घ्यावा’, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुरुषोत्तम खेडेकर आणि मनोज आखले यांनी केली आहे. संभाजी ब्रिगेडने विरोध चालू केल्यामुळे रायगडमध्ये संतापाचे वातावरण आहे. रायगडमधील राजकीय पक्षांनीही संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या भूमिकेविषयी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.

… अन्यथा मनसे संभाजी ब्रिगेडचा बंदोबस्त करील ! – जितेंद्र पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष, मनसे

अप्पासाहेब धर्माधिकारी हे लाखोंचे श्रद्धास्थान आहेत. संभाजी ब्रिगेडने त्याला विरोध करून चुळबूळ करू नये, नाहीतर मनसे त्यांचा बंदोबस्त करेल.

पू. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य प्रेरणादायी !- महेंद्र दळवी, आमदार, शिवसेना (शिंदे गट)

अप्पासाहेब धर्माधिकारी मागील ३० वर्षे निरूपण, तसेच सामाजिक माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्य अव्याहतपणे करत आहेत. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांना संभाजी ब्रिगेडकडून होणारा विरोध चुकीचा आहे.

डॉ. धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण घोषित होणे योग्यच ! – आदिती तटकरे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

अप्पासाहेबांनी विविध सामाजिक उपक्रमांतून मानवतेचा संदेश अधोरेखित करत तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी आणि समाजाच्या सेवेसाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. त्यामुळे त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ घोषित होणे योग्यच आहे.

अप्पासाहेबांना विरोध हा विकासाला विरोध ! – चित्रलेखा पाटील, शेकाप

नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अप्पासाहेबांनी अध्यात्म आणि सामाजिक सेवा यांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवला आहे. त्यांनी आदिवासी वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले आहे. अशा तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वेचणार्‍या अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ घोषित झाल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे. त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांचा गौरव होत आहे; मात्र समाजासाठी तळागाळात कार्य करणार्‍या अप्पासाहेबांना विरोध करणे म्हणजे समाजातील चांगल्या कार्याला, विकासाला विरोध करण्यासारखे आहे.

द्वेष आणि जातीयवाद पसरवणार्‍यांचा बंदोबस्त करा ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई – ‘श्री समर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा आणि पद्मश्री पू. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२२ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित केला आहे. वस्तूतः या पुरस्कारामुळे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची उंची वाढलेली आहे; मात्र काही जातीयवादी संघटनांनी त्याला विरोध केला आहे. कोकणात त्यांनी व्यसनमुक्ती, स्वच्छता आणि सदाचार शिकवून लाखो लोकांना सन्मार्गाला लावले आहे. ‘दासबोधा’च्या शिकवणीतून अनेक सुसंस्कारित पिढ्या घडवल्या आहेत. ज्यांचा इतिहास केवळ तोडफोड आणि धमक्या यांचा आहे, तसेच समाजहिताचे कोणतेही कार्य नाही, अशा संघटनेने अशा थोर विभूतीला विरोध करणे, हे हास्यास्पद आहे. अशा प्रकारे द्वेष आणि जातीयवाद पसरवणार्‍यांचा बंदोबस्त महाराष्ट्र शासनाने करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले,

१. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला विरोध करणार्‍या संघटनांनी राज्यात आतापर्यंत केवळ जातीयवादच पसरवला आहे. असाच विरोध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनाही ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित झाल्यावर करण्यात आला होता.

२. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची निवड ही संबंधित व्यक्तीचा पूर्ण अभ्यास करून शासकीय निवड समितीद्वारे केली जाते. पूज्य धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्याचे कोकणातील ‘शेकाप’, ‘शिवसेना’, ‘भाजप’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ आदी सर्व पक्ष तथा सामाजिक संघटनांनी मनापासून स्वागत केले आहे.

३. पूज्य अप्पासाहेब धर्माधिकारी हे दासबोध आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या विचारांचा प्रसार करतात, हे खरे विरोधाचे कारण आहे. जातीभेद मिटवण्याचे कार्य करणार्‍या संतांना ‘वर्णभेद आणि अंधश्रद्धा पसरवणारे’, असे म्हणणे, हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे.

४. देशभरात चित्रपट क्षेत्रातील नट-नट्यांना पुरस्कार घोषित होतात. त्यांतील काहींवर तर गंभीर गुन्हे वा आरोपही असतात. तेव्हा ही मंडळी कुठे जातात ? त्यामुळे अशा जातीयवादाचे उच्चाटन करण्यासाठी समाजानेही संघटित झाले पाहिजे.