धनुष्यबाण आणि मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्याचे आवाहन
मुंबई – चोरांनी धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव चोरले आहे; मात्र शिवसेना पक्ष संपणार नाही. स्वायत्त संस्था मोदी सरकारच्या गुलाम आहेत. कटकारस्थान रचून राजकारण केले जात आहे. कदाचित आपले मशाल हे निवडणूक चिन्हही जाऊ शकते, असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिल्यानंतर १८ फेब्रुवारी या दिवशी मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. भर रस्त्यात गाडीतूनच कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ते बोलत होते.
या वेळी ‘मर्द असाल, तर चोरलेले धनुष्यबाण निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरा. मी मशाल घेऊन येतो. कोण जिंकतो ते बघूया’, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
‘धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो. रावणाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तो उताणा पडला होता, तसेच हे चोर आणि चोरबाजाराचे मालक शिवधनुष्य पेलतांना उताणे पडल्याविना रहाणार नाहीत’, असेही ते या वेळी म्हणाले.