मुंबई, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत शिवनेरी किल्ल्यावर ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
याविषयी अधिक माहिती देतांना मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘१८ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. १९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत शिवजन्मोत्सव, दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत शिववंदना कार्यक्रम, सायंकाळी ६.१५ ते ७ या वेळेत महाशिवआरती, तर सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत ‘जाणता राजा’ हे महानाट्य होणार आहे. या सोहळ्यामध्ये १ लाख शिवप्रेमी सहभागी होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. शिवनेरी गडाच्या पायथ्याजवळील जुन्नर येथे ‘शिवकालीन गाव’ साकारले जाणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबिर, विविध स्पर्धांचे आयोजन आदी कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.’’