ईश्वरपूर (जिल्हा सांगली), १७ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’ विरोधी, गोहत्या बंदी आणि धर्मांतरबंदी कायदा करावा, उरूण इस्लामपूरचे ‘उरूण ईश्वरपूर’ नामकरण व्हावे, फाल्गुन अमावास्येला छत्रपती संभाजी महाराज ‘बलीदानदिन’ घोषित करण्यात यावा, या मागण्यासांठी ईश्वरपूर येथे १७ फेब्रुवारीला झालेल्या ‘हिंदु गर्जना मोर्चा’साठी ५ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन तहसीलदार कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर याचा समारोप झाला. मोर्च्यात महिला आणि युवती यांची संख्या लक्षणीय होती.
या मोर्च्यात ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष श्री. निशिकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (शिंदे गट) श्री. आनंदराव पवार, भाजपचे श्री. विक्रम पाटील, श्री. राहुल महाडिक, श्री. सम्राट महाडीक, ‘ईश्वरपूर व्यायाम मंडळा’चे श्री. मानसिंग पाटील, हिंदू एकता आंदोलनचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, माजी नगरसेवक श्री. लीलाचंद नवलमल शहा, सर्वश्री कपिल ओसवाल, अमित ओसवाल, पाटीदार समाजाचे सर्वश्री किरीट पटेल, दीपक पटेल, सतिश पटेल, संदीप पटेल यांसह भाजप, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, संप्रदाय यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.