खासदार नवनीत राणा यांच्या वडिलांची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली !

मुंबई – शिवडी महानगर दंडाधिकार्‍यांनी फरार घोषित केल्याच्या निर्णयाला खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कुंडलेस यांनी मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. स्वत:ला ‘फरार’ घोषित करण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी कुंडलेस यांनी न्यायालयाकडे केली होती; मात्र मुंबई सत्र न्यायालयाने ही मागणी अमान्य केली आहे. त्यामुळे हरभजन सिंह कुंडलेस यांना ‘फरार’ घोषित करण्याची प्रक्रिया चालू रहाणार आहे.

खासदार नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेतील निवडणूक लढवली; मात्र त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या जातीच्या प्रमाणपत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंह कुंडलेस यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात कुंडलेस यांनी दोषमुक्त करण्याची विनंती मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती; मात्र त्याची ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.