रामरक्षा ही मानवाच्या शरिराच्या व्याधींवरील औषधी ! – वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले

सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – रामरक्षा म्हटल्यावर हीच रामरक्षा आपल्या शरिरावर औषधासारखे काम करू शकते; कारण या स्तोत्रामध्ये रामाविषयी लावलेली अनेक विशेषणे आपल्या शरिराच्या विविध भागांवर त्याचे उच्चारण केले असता औषधासारखे काम करतात, असे प्रतिपादन वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी केले. समर्थ सदन येथे ‘श्री समर्थ सेवा मंडळा’च्या वतीने दासनवमी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनामध्ये ते बोलत होते.

वेदमूर्ती गोडबोले

वेदमूर्ती गोडबोले म्हणाले, ‘‘सर्व अवयवांशी निगडित असलेली रामरक्षा आपण औषध म्हणून स्वीकारू शकतो. रामरक्षाचे पठण करतांना आपल्यापुढे तांब्यात पाणी घेऊन त्याकडे पाहून रामरक्षा म्हटली, तर त्याचे औषध सिद्ध होते. हे औषध तुम्ही प्राशन करा, स्वतःच्या अंगावर शिंपडा निश्चितच शरिरातील दोष निघून जातील. पाण्यावर जपानी डॉक्टरने अभ्यास केला आणि त्याला हे उमगले की, पाण्याला ऐकता येते, पहाता येते. पाण्याला दिसते आणि त्या पाण्याला स्मरणशक्तीही असते. ‘हिडन मेसेजेस इन वॉटर’, असे या पुस्तकाचे नाव असून त्या डॉक्टरांनी याविषयी २२ वर्षे अभ्यास केला आहे. प्रत्येकाच्या शरिरात ७० टक्के पाणी आहे. पाण्यात सोडलेल्या या विशेष शक्ती परमेश्वराने सिद्ध केल्या आहेत. त्या हवेत, पृथ्वी तत्त्वात आणि तेजतत्त्वातही आहेत; मात्र त्यांच्यावर अद्याप अभ्यास झालेला नाही, प्रयोग झालेला नाही. तीच अवस्था आपल्या प्रत्येकाच्या शरिरात आहे; कारण शरीर हे पंचमहाभूतांनीच सिद्ध झालेले आहे.’’