दापोली (रत्नागिरी) – तालुक्यातील ऐतिहासिक बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दाभोळ धक्क्यावर भूमीत गाडलेल्या आणि गंज लागलेल्या तोफांचे संवर्धन करायला हवे. राज्य पुरातत्व विभाग आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात तात्काळ कारवाई करून तोफांचे संवर्धन करावे, अशी मागणी येथील सह्याद्री प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे.
दाभोळ धक्क्यावर सीमा शुल्क कार्यालया समोरील भागात १ तोफ चौथर्यावरून पडली असून तिला गंज लागला आहे. त्याच ठिकाणी दुसरी एक तोफ भूमीमध्ये उलटी गाडलेली आहे. तिसरी तोफ दाभोळ बंदर येथील एस्.टी. थांबा येथे उलटी गाडलेली आहे.
भूमीत गाडलेल्या या तोफा बाहेर काढून सुस्थितीत असलेल्या तोफेच्या बाजूला चौथर्यावर ठेवण्यात याव्यात. तोफा या आपल्या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा असून या तोफांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सागर पाटील, ओंकार मोरे, राहुल खांबे आणि गणेश रघुवीर यांनी कोकणातील दुर्ग भ्रमंती दरम्यान या तोफांची नुकतीच पहाणी केली आणि त्यांनी ही मागणी केली आहे.
याविषयी गणेश रघुवीर म्हणाले की, दापोली तालुक्यातील दाभोळ हे ऐतिहासिक गाव आहे. दाभोळ हे महाराष्ट्रातील मध्ययुगीन सागरी पुरातत्वीय स्थळ असून वाशिष्ठी नदीच्या उत्तर किनार्याच्या मुखापाशी आहे. दाभोळ बंदर हे १४ व्या शतकापासून वापरात होते. मध्ययुगीन कालखंडातील समुद्र मार्गावरील व्यापार आणि लढाई यांसाठी या तोफांचा वापर केला जात असे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी प्रशासनाकडे का करावी लागते ? खरेतर प्रशासनानेच अशा ऐतिहासिक वस्तूंचे जतन करायला हवे ! |