पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांनी मिरज येथील सनातनच्या आश्रमात केलेले मार्गदर्शन

‘१४.१२.२०२२ या दिवशी पू. नरुटेआजोबा मिरज येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी त्यांनी साधकांशी बोलतांना सांगितलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. राजाराम नरुटे

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार असल्यामुळे सनातनचे कार्य पुष्कळ गतीने वाढत आहे 

‘प.पू. डॉक्टरांचे कार्य फार मोठे आहे. त्यांचे बळ पुष्कळ आहे. त्यांच्यामुळेच सनातनचे कार्य शीघ्र गतीने वाढत आहे. ते सामान्य नसून ते श्रीविष्णूचा अवतार आहेत. श्रीविष्णु प्रत्येक युगात अवतार घेतो, तसे याही युगात त्याने अवतार घेतला आहे; म्हणून हे एवढे मोठे धर्मकार्य होत आहे.

श्री. शंकर नरुटे

२. सांप्रतकाळी धर्मकार्यच व्यवस्थित न चालल्यामुळे समाजाचे सर्वच कार्य बिघडलेले असणे

समाजात वाढलेला हा भस्मासुर श्रीविष्णूच्या कृपेने भस्म होऊन जाईल. आपण धर्मकार्याशी एकरूप झाले पाहिजे. धर्मकार्य झाले की, समाजकार्य आणि राजकारण हे सर्वच योग्य प्रकारे होत जाते. आता धर्मकार्यच व्यवस्थित न चालल्यामुळे सर्वच व्यवस्थापन कार्य बिघडले आहे.

३. प्रपंच करावा नेटका आणि परमार्थाची गती धरावी !

प्रपंच नेटका करा, म्हणजे व्यवस्थित करा आणि त्यातूनच परमार्थाचा चुटका मारावा, म्हणजे गती धरावी. त्यामुळे धर्मकार्याशी एकरूप होऊन एकनिष्ठेने कार्य करावे आणि भगवंताशी एकरूप व्हावे.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले सगळ्यांशी एकरूप झालेले असल्याने त्यांच्याशी बोलतांना स्वतःचे भानच न रहाणे

सर्व संतांचे कार्य एकच आहे. संत एकमेकांशी एकरूप झालेले असतात. प.पू. डॉक्टर आणि आम्ही एकच आहोत. प.पू. डॉक्टर सगळ्यांशी एकरूप झालेले आहेत. त्यामुळे मी बोलतांना त्यांच्याशी पूर्ण एकरूप होऊन बोलत होतो. नंतर मलाच प्रश्न पडला की, ‘मी इतके बोलू कसे शकलो ?’ मी गावातील लोकांशीही कधी एवढे बोलत नाही. परात्पर गुरुदेवांनीच काहीतरी किमया केली. त्यामुळे मी एवढा बोललो. हे सर्व दैवी आहे. आजही हे मी बोलत नसून माझा अंतरात्मा बोलत आहे. आत्मा बोलत असतांना मला माझे भान रहात नाही.’

– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.१.२०२३)

देव पहाण्यासाठी गेलो आणि स्वतःच देव होऊन बसलो ! – पू. नरुटेआजोबा

‘पू. नरुटेआजोबा प.पू. डॉक्टरांना भेटण्यासाठी आणि रामनाथी गोवा येथील सनातनचा आश्रम पहाण्यासाठी गेले होते आणि तिकडे गेल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना संत म्हणून घोषित केले’, असे त्यांना वरील वाक्यातून म्हणायचे होते.’