अकोला – भारतीय चलनात भारतीय रिझर्व्ह बँकेने लागू केलेली १० रुपयांची नाणी काही ठिकाणी स्वीकारण्यास नकार दिला जात आहे, अशा तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. तथापी नाणी स्वीकारणे हे बंधनकारक असून भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा प्रकारे भारतीय चलन स्वीकारण्यास नकार देणार्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद होऊन तो शिक्षेस पात्र ठरू शकतो, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त तक्रारींची गंभीर नोंद घेण्यात आली असून अशा प्रकारे चलनातील नाणी स्वीकारण्यास नकार देणार्या व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम १२४ अन्वये गुन्हा नोंद करून कारवाई करावी, असे निर्देशही पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांनुसार रिझर्व्ह बँकेने लागू केलेले चलन स्वीकारण्यास कुणीही नकार देऊ शकत नाही.
अशाप्रकारे बँका, व्यापारी आणि व्यक्ती कायदेशीर चलन स्वीकारण्यास नकार देत असतील, तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. १० रुपयांचे नाणे हे राष्ट्रीय चलन आहे. हे नाणे न घेणार्या व्यक्तीकडून लेखी स्वरूपात नाणे नाकारण्याचे कारण घ्यावे. त्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर पोलीस संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करतील. या गुन्ह्यात दंडासह ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांत म्हटले आहे.