‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’, ‘समलैंगिकता’ ही आपली संस्‍कृती नाही ! – नवनीत राणा, आमदार, अमरावती

 

अमरावती – मीही याच पिढीची आहे. मी माझ्‍या संपूर्ण जीवनात कधीही ‘लिव्‍ह इन रिलेशन’विषयी ऐकले नव्‍हते; पण आजच्‍या पिढीकडून हे सगळे ऐकत आहे. आई-वडील मुलांना शिक्षणासाठी दुसर्‍या शहरात पाठवतात; पण तिथे मुली भाड्याच्‍या घरात मुलांसमवेत ‘लिव्‍ह इन रिलेशन’मध्‍ये रहातात. मुलं-मुलांसमवेत लग्‍न करतात आणि मुली मुलींसमवेत लग्‍न करत आहेत. ही कुठली परंपरा आपल्‍या जीवनात आली ? थोडे पैसे कमवायला लागलो म्‍हणून असे वागायचे, ही आपली संस्‍कृती नाही, असे आमदार नवनीत राणा अमरावती येथे एका कार्यक्रमात बोलतांना म्‍हणाल्‍या.

या वेळी त्‍या पुढे म्‍हणाल्‍या की, आपण स्‍वावलंबी झालो आहोत; पण आपल्‍याला स्‍वावलंबी करण्‍यासाठी आपल्‍या आई-वडिलांनी रक्‍ताचे पाणी केले आहे. म्‍हणून आपण या पदापर्यंत पोहोचलो. आई-वडिलांनी त्‍यांचे कर्तव्‍य पार पाडले आहे. आता आपणही समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. देवाने प्रत्‍येकाला काही ना काही तरी करायला पाठवले आहे. समाजाचे आपण देणे लागतो. समाजाने आपल्‍याला रहाण्‍याची पद्धत शिकवली. समाजाने आपल्‍याला नाव दिले. आपण समाजासाठी किमान दहा टक्‍के दिले तरी पुष्‍कळ झाले. हे करण्‍यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.

संपादकीय भूमिका

पाश्‍चात्‍य संस्‍कृतीचे हे दुष्‍परिणाम घालवण्‍यासाठी धर्मशिक्षणच हवे !