१. ‘कु. प्रार्थना नेहमी आनंदी आणि उत्साही असते.
२. आवाजातील माधुर्य
तिच्या बोलण्यात पुष्कळ माधुर्य आहे. ‘तिचे बोलणे ऐकतच रहावे’, असे मला वाटते. तिच्या बोलण्यातील गोडवा शब्दांत वर्णन करण्याच्या पलीकडे आहे.
३. ती नेहमी शिकण्याच्या स्थितीत असते.
४. लहान वयातच इतरांना समजून घेऊन भावाच्या स्तरावर दैवी बालकांचा सत्संग घेत असलेली कु. प्रार्थना पाठक !
४ अ. सहजता : प्रार्थना दैवी बालकांचा सत्संग घेते. ती वयाने लहान असूनही तिच्यामध्ये ‘समयसूचकता आणि सहजता’ हे गुण आहेत. ती सर्वांशी सहजतेने आणि अत्यंत प्रेमानेे बोलते. ती एखाद्या साधकाला जे सांगते, ते तो मनापासून स्वीकारतो.
४ आ. उत्तम निरीक्षणक्षमता : एकदा तिने दैवी बालकांच्या सत्संगात ‘स्वतःच्या शरिराविषयी कृतज्ञताभावात रहायचे’, असे ध्येय दिले. दुसर्या दिवशी त्याचा आढावा सत्संगात द्यायचा होता. तेव्हा प्रार्थनाने सांगितले, ‘‘आश्रमात आजी-आजोबा आहेत. ते शरिराने थकले असूनही सेवा करतात. ते शरिराने थकले आहेत; पण त्यांचे मन थकले नाही. ते पुष्कळ साधेपणाने रहातात. खरे म्हणजे साधेपणातच सौंदर्य आहे. त्यांच्याकडे पाहून चांगले वाटते.’’
४ इ. इतरांचा विचार करणे
१. सत्संगात साधक बोलत असतांना त्या साधकाला बोलतांना काही अडचण येत असल्यास किंवा त्रास होत असल्यास प्रार्थना सहजतेने आणि प्रेमानेे त्यांना पाणी प्यायला सांगते.
२. सत्संगात २ हिंदी भाषिक बालसाधिका असल्याने सत्संग हिंदीतून घेतला जात असे. तेव्हा प्रार्थनाने विचारले, ‘‘सत्संग हिंदी भाषेतून आहे. कुणाला भाषेची अडचण आहे का ? तुम्हाला जो भाग समजला नाही, तो पुन्हा मराठीत सांगूया.’’ काही बालसाधकांना सत्संगातील सूत्रे समजण्यात अडचण होती. तेव्हा तिने काही सूत्रे पुन्हा मराठीतून सांगण्यास आरंभ केला.
३. ती सत्संगात वेगवेगळे ध्येय देते. एकदा तिने ‘आपण ५० प्रार्थना करूया’, असे ध्येय दिले. नंतर तिने सर्वांना विचारले, ‘‘आजचे ध्येय सर्वांना चालेल ना ? कुणाला ताण आला नाही ना ? आपण ताण घ्यायचा नाही; कारण आपण काही करतच नाही. आपली गुरुमाऊलीच सर्वकाही करत आहे. आपण त्यांनाच प्रार्थना करूया, ‘तुम्हीच हे ध्येय दिले आहे. ते तुम्हीच आमच्याकडून पूर्ण करून घ्या.’’
४ ई. उत्स्फूर्तपणे बोलणे : सत्संगात साधक चुका सांगत असतांना ती संबंधित साधकाला योग्य दृष्टीकोन देते. त्या वेळी ‘काय बोलायचे’, हे तिला त्याच क्षणी सुचते. तिला याचा विचार करावा लागत नाही.
४ उ. साधकांचे पालकत्व घेणे : तिच्यामध्ये लहान वयातच ‘पालकत्व घेणे आणि मातृवत प्रेम करणे’, हे गुण दिसून येतात. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘ही दैवी बालके पुढे ईश्वरी राज्य चालवतील आणि ईश्वरी राज्यातील प्रजा आनंदी असेल’, या उद़्गारांची प्रचीती येते.
५. भाव
५ अ. ती प्रत्येक प्रसंगात देवाचे साहाय्य घेते.
५ आ. प्रार्थना सांगत असलेला भावप्रयोग साधकांना अनुभवता येणे : तिला ईश्वरी ज्ञान अखंड मिळत असते. तिला कधीही अकस्मात् भावप्रयोग घ्यायला सांगितला, तरीही ती सहजतेने आणि भावपूर्ण भावप्रयोग सांगते. तिला भावप्रयोग सांगणे आणि कृतीला भावाची जोड देणे, याविषयी फार चांगले सुचते. ती सांगत असलेला भावप्रयोग आपण अनुभवू शकतो.
५ इ. प्रार्थनाने कविता किंवा सूत्रे लिहिल्यावर ती तिच्या नावाच्या आधी ‘गुरुदेवांचे आनंदी फूल’ असे लिहिते.’
– श्री. हरीश पिंपळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल (२.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |