१८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी महाशिवरात्री आहे. त्या निमित्ताने..
‘परात्पर गुरु डॉक्टर, मी तुम्हाला मला आलेल्या भगवान शिवाशी संबंधित सर्व अनुभूती सांगितल्या होत्या. तेव्हा तुम्ही मला ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करायला सांगितला होता. त्याबद्दल आणि तुमच्या कृपेने मला आलेल्या अनुभूती तुमच्या चरणी अर्पण करून मी कृतज्ञता व्यक्त करत आहे.
१. नामजप श्वासाला जोडला जाऊन तो आतून ऐकू येणे आणि मनात ‘कैलास पर्वतावर जाऊन वेगवेगळ्या सेवा करत आहोत’, असे विचार येणे
‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप माझ्या श्वासाशी जोडला आहे’, असे मला जाणवते; कारण मला तो आतून ऐकू येतो. त्यामुळे काही वर्षांपासून माझी भावजागृती होत आहे. मला जाग आली, तरी माझा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप चालू असतो. त्या वेळी ‘झोपेतही माझा नामजप चालू आहे’, असे मला वाटते. मला आधी निराशा यायची. आता मी नामजप करते. त्यामुळे मनातील विचार पूर्ण बंद झाले आहेत. आता माझ्या मनात ‘मी कैलास पर्वतावर जाऊन वेगवेगळ्या सेवा करत आहे’, असे विचार येतात.
२. याआधी ‘शिवाचे दर्शन व्हावे, कैलासावर जाऊन सेवा करण्याची संधी मिळावी’, असे वाटणे आणि आता ‘रामनाथी आश्रमातच कैलास आहे’, असे वाटणे
मला मध्येच भावप्रयोग सुचतात. त्यामुळे मला भावस्थितीत रहाता येतेे. मला पुष्कळ वेळा वाटायचे, ‘शिव कसा आहे ? एकदा तरी मला त्याचे दर्शन व्हावे. माझे आयुष्य कैलासावर सेवा करण्यासाठीच आहे.’ आता मला वाटते की, ‘रामनाथी आश्रमच माझा कैलास आहे.’ तुम्ही (परात्पर गुरु डॉक्टर) इथे आहात आणि तुमच्याविना मला शिव भेटणार नाही. ‘तुम्ही मला नामजप आणि सेवा यांच्या माध्यमातून भगवान शिवाशी एकरूप करून घ्याल आणि कैलासावर घेऊन जाल’, अशी माझी श्रद्धा आहे.
३. ब्राह्ममुहूर्तावर ‘शिव ध्यानस्थ बसला आहे’, असे दिसणे आणि शिवाच्या सभोवताली निळा प्रकाश पाहून भान हरपणे
‘मला ब्राह्ममुहूर्तावर जाग येते आणि मी उठून जवळच पाणी आणायला जाते. तेव्हा मला वाटेत झाडांमधून निळा प्रकाश येतांना दिसतो; म्हणून मी त्या दिशेने जाते. तेथे पोचल्यावर मला ‘तिथे शिव ध्यानस्थ बसला आहे’, असे दिसते. मला त्याच्याभोवती निळा प्रकाश दिसतो. ‘तो त्याच्या त्वचेतून बाहेर पडत आहे’, असे मला दिसते. हे सुंदर दृश्य दिसल्यावर मी माझे अस्तित्व विसरते.
४. कैलास पर्वतावर दिसलेली दृश्ये आणि तेथे आलेल्या अनुभूती
४ अ. शिव-पार्वती यांचे भक्तांवर असलेले प्रेम पाहून साधिकेची भावजागृती होणे : ‘कैलास पर्वतावर नवरात्रोत्सव चालू असतो. तेव्हा तेथील रहिवासी पार्वतीदेवीची ओटी भरतात. शिव आणि पार्वती यांच्या चरणी फुले अर्पण करतात. शिव-पार्वती यांचे भक्तांवर असलेले प्रेम पाहून माझी भावजागृती होते.
४ आ. त्या वेळी मी ‘पार्वतीदेवी किती भाग्यवान आहे ! ती शिवाची अर्धांगिनी आहे’, असा विचार करत असतांना मी काही क्षण देवीच्या जागी उभी राहून तिची भक्ती अनुभवण्याचा प्रयत्न करते. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती होत होती.
४ इ. ‘मोगर्याची फुले शिवाच्या चरणी अर्पण करावी’, असे साधिकेला वाटणे : एकदा मी कैलासावर निवासाला होते. मला पहाटे जाग येते आणि डोळ्यांसमोर मोगर्याचे झाड दिसते. त्या झाडाला पुष्कळ फुले आलेली पाहून माझ्या मनात ‘ही सर्व फुले शिवाच्या चरणांवर अर्पण करावी’, असा विचार येतो. त्या वेळी शिव माझ्यामागे येऊन उभा रहातो.
४ ई. शिव ध्यानस्थ बसत असलेल्या शिळेभोवतालच्या भूमीवरील केर काढत असतांना शिवाच्या जटेतून वहाणार्या गंगेच्या पाण्याचे थेंब चेहर्यावर उडणे : मला पुष्कळ वेळा ‘भगवान शिव ध्यानस्थ बसतो, त्या शिळेभोवतालचा केर मी काढत आहे’, असे दिसते. केर काढतांना मी भगवान शिवाच्या जवळ पोेचते. तेव्हा त्याच्या जटेतून वहाणार्या गंगेच्या पाण्याचे थेंब माझ्या चेहर्यावर उडतात.
४ उ. कैलास पर्वतावर पंगतीत जेवायला बसले असता भगवान शिवाचे चरण दिसणे आणि भावजागृती होणे अन् रामनाथी आश्रमात जेवायला बसले असता समोरून साधक गेल्यावर वरील प्रसंगाची आठवण होऊन भावजागृती होणे : एकदा कैलासावर उत्सव होता. तेथे मी पंगतीत जेवायला बसले होते. मी तोंडात घास घालणार, इतक्यात मला भगवान शिवाचे चरण दिसतात आणि मी जेवायची थांबते. भगवान शिव ‘सर्वांना पोटभर प्रसाद मिळाला ना ?’ हे पहाण्यासाठी स्वतः पंगतीत आले होते. त्यांच्या चरणांकडे पहातांना माझी भावजागृती झाली. मी रामनाथी आश्रमाच्या स्वयंपाकघरात जेवत असतांना कुणी साधक समोरून गेले, तरी मला वरील प्रसंगाची आठवण होऊन माझी भावजागृती होते.
४ ऊ. कैलास पर्वतावर भगवान शिवासाठी प्रतिदिन स्मशानात जाऊन भस्म जमा करण्याची सेवा करतांना प्रत्येक चितेतून ‘ॐ नमः शिवाय ।’ नामजप ऐकू येणे : माझ्याकडे प्रतिदिन भगवान शिवासाठी स्मशानात जाऊन चितेतील राख जमा करण्याची सेवा असते. या सर्व चिता किती भाग्यवान आहेत ! यांतील राखेला भगवान शिवाच्या शरिरावर भस्म म्हणून रहाण्याची संधी मिळते. मी महादेवांना प्रार्थना करून विचारते, ‘यातील कोणत्या चितेचे भस्म घेऊ ?’ मला प्रत्येक चितेतून ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप ऐकू येतो. त्यामुळे मी प्रत्येक चितेतून थोडे थोडे भस्म जमा करते.
४ ए. कैलास पर्वतावर नामजप करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले भगवान शिवाला भेटायला आले आहेत’, असे साधिकेला दिसणे : एकदा मला नामजप करतांना ‘मी कैलासावर आहे’, असे दिसले. तेव्हा भगवान शिव ध्यानस्थ बसलेले होते आणि मी शिळेभोवतालचा केर काढत होते. तेव्हा समोरून कुणीतरी येतांना दिसले आणि त्यांच्या दिशेने पांढरा प्रकाश दिसत होता; म्हणून मी समोर पाहिले, तर परात्पर गुरु डॉक्टर भगवान शिवाला भेटायला आले होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरु डॉक्टर पुष्कळ काळ माझे गुरु होते. मी आज त्यांच्यामुळेच कैलासावर आहे. त्यांच्या आश्रमात मी सेवा करत असे’, या विचाराने मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटली.
५. स्वतःच्या मृत्यूविषयी दृश्य दिसणे
५ अ. ‘मृत्यूनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले कैलास पर्वतावर सोडायला आले आहेत’, असे दृश्य दिसणे : एकदा नामजप करतांना माझ्या मनात ‘माझा मृत्यू झाला आहे आणि मी गेले, तरी परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेत असतील’, असा विचार आला. तेव्हा ‘ते मला कैलास पर्वतावर सोडायला आले आहेत’, असे दृश्य दिसले.
५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला भगवान शिवाकडे घेऊन जाणे आणि तिची शिवाशी भेट करून देणे, गुरुदेवांनी शिवाचे कौतुक केल्याचे पाहून साधिकेची भावजागृती होणे : कैलास पर्वतावर येणार्या व्यक्तीच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर पांढरी फुले आहेत. ती सर्व फुले नामजप करत आहेत. तेथील एक वाट भगवान शिव ध्यानस्थ बसलेले असतात, तिकडे जाते. परात्पर गुरु डॉक्टर माझा हात धरून मला त्या वाटेवरून नेतांना दिसतात. ते मला सुंदर फुले, वनस्पती, झाडे, प्राणी, पक्षी आणि निसर्ग याविषयी माहिती सांगत होते. मला तो सुंदर पर्वत बघून कृतज्ञता वाटत होती आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर समवेत आहेत’ या विचाराने मला आतून आनंद होत होता. परात्पर गुरु डॉक्टर चालतांना शांत उभे राहून हसले. तेव्हा ‘शिवाचे दर्शन होण्याची वेळ जवळ आली आहे’, हे माझ्या लक्षात आले. परात्पर गुरु डॉक्टर मला शिवाच्या समोर नेऊन उभे करतात. त्यांच्या समोर उभी राहिल्यावर परात्पर गुरु डॉक्टर मला विचारतात, ‘झाले ना दर्शन ? तुला महादेवाला भेटायचे होते ना ? बघ, तो किती सुंदर आणि तेजस्वी दिसतो !’ गुरुदेवांच्या मुखातून शिवाची स्तुती ऐकल्यावर माझी भावजागृती झाली.
५ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले कैलासावर सोडून त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी जाणार’, याची साधिकेला जाणीव होऊन तिला पुष्कळ रडायला येणे : परात्पर गुरु डॉक्टर मला आेंजळ पुढे करायला सांगतात आणि माझ्या हातात मोगर्याची फुले ठेवतात. (‘ती फुले त्यांच्या ओंजळीत अकस्मात् आली ?’, असा विचार माझ्या मनात येतो.) त्यांनी माझ्या हातावर फुले ठेवल्यावर ‘त्या फुलांना काही वजनच नाही’, असे मला वाटते. ‘ही फुले मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण करायला हवीत’, याची मला जाणीव होते; कारण ते नसते, तर मला शिवाची उपासना आणि नामजप कळला नसता. मी खाली बसून परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी ती फुले अर्पण करते. तेव्हा त्यांच्या चरणांचा स्पर्श मला होतो आणि ‘ते मला कैलासावर सोडून त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी जाणार’, याची मला जाणीव होते आणि मला पुष्कळ रडायला येते.
५ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर वाहिलेली फुले महादेवाच्या चरणांवर दिसणे, ते पाहून भावजागृती होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले अन् शिव एकच आहेत’, असे साधिकेच्या लक्षात येणे : माझ्या मनातील विचार परात्पर गुरु डॉक्टरांना कळतो; म्हणून त्यांनी मला महादेवाच्या चरणांकडे पहायला सांगितले. तेव्हा मी ‘परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणांवर वाहिलेली फुले महादेवाच्या चरणांवर आहेत’, असे मला दिसले. ते बघून माझी भावजागृती झाली. मी परात्पर गुरु डॉक्टर यांच्याकडे पाहिले. तेव्हा ते हसत होते. त्यांच्या दृष्टीतून ‘ते आणि शिव वेगळे नाहीत अन् ‘मी त्यांची सेवा केली, तरी ती महादेवाची सेवा केल्याप्रमाणेच आहे’, हे मला कळले. मी कैलास पर्वतावर असेन किंवा रामनाथी आश्रमात असेन, कुठेही असले, तरी महादेवापासून दूर नसते. माझे सर्वस्व आणि अस्तित्व केवळ गुरुदेव अन् महादेव आहेत. या जगात मला अन्य कुणीच नाही.’
– कु. स्मितल भुजले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |