नगर येथील साकूर भागात भुताटकीच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर !

संगमनेर (जिल्हा नगर) – संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सर्वांत मोठा बाजार असलेल्या साकूर गावात भुताटकीच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाहेरगावाहून लोक येथे येत असून त्यांनी एक विशिष्ट धर्म स्वीकारला आहे. त्या धर्माच्या धर्मग्रंथांचा आधार घेत लोकांची आर्थिक लूट केली जात आहे. विशेषकरून ही टोळी हिंदूंना फसवण्याचे काम करत आहे. एवढेच नाही, तर ‘आपल्या घरातील देव्हार्‍यातील देवांना नदी किंवा विहीर यांमध्ये टाकून द्या’, असे सांगितले जाते किंवा आडव्या खुंटीला देव्हार्‍यातील देवांना टांगले जाते. कुठल्याही मंदिरात जाण्यापासून रोखले जाते. हिंदु संस्कृतीच्या विरोधात हे सर्व कार्यक्रम चालू आहेत. यात काही राजकीय पुढारीही सहभागी आहेत.

तेथील रहिवाशांनी सांगितले की, साकूर गावातील एक व्यक्ती पाश्चिमात्य धर्माचा प्रसार करत आहे. तसेच प्रत्येक बुधवारी बाहेरगावाहून काही लोकांना बोलावून त्यांच्या माध्यमातून हिंदु धर्म आणि इतर धर्मांपेक्षा हा पाश्चिमात्य धर्म कसा श्रेष्ठ आहे ? हे पटवून देण्याचे काम केले जाते. तसेच संबंधित पीडित व्यक्तींना विविध लालूच दाखवत त्यांना भुते उतरवण्याच्या नावाखाली बाहेरगावी नेले जाते. बाहेरगावी नेले जाणार्‍या व्यक्तींमध्ये महिला अधिक प्रमाणात आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणे आवश्यक आहे. तसेच बळजोरीने किंवा आमीष दाखवून धर्मांतर करणार्‍यांना कठोर शिक्षा होणेही तितकेच आवश्यक आहे.