पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यूची ‘एस्.आय्.टी.’ चौकशी होणार ! – देवेंद्र फडणवीस

मुंबई – दैनिक ‘महानगरी टाईम्स’ चे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूची विशेष अन्वेषण पथकाद्वारे (एस्.आय्.टी.) द्वारे चौकशी केली जाईल, असा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे. ६ फेब्रुवारी या दिवशी राजापूर येथील पेट्रोलपंपावर वारिसे यांना चारचाकीने धडक दिल्याने ते गंभीर घायाळ झाले. ७ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर येथे त्यांचा मृत्यू झाला. वारिसे यांना धडक देणारा कारचालक पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी ६ फेब्रुवारीला रात्री अटक करून त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली. हा घातपात असल्याचा आरोप रिफायनरीविरोधी संघटनेने केला आहे. राज्यात पत्रकार संघांकडून वारिसे यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करण्यात येत होती. वारिसे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी तेलशुद्धीकरणाविषयी दिलेल्या बातम्या आरोपी पंढरीनाथ आंबेकर याच्याशी संबंधित होत्या. या प्रकरणी तपास चालू आहे.