बीजिंग (चीन) – आफ्रिका खंडातील देशांना कर्ज देऊन त्यांना आर्थिक गुलाम बनवण्याच्या सिद्धतेत असणार्या चीनने आता तेथे सैनिकी तळ स्थापन करण्याची सिद्धता केली आहे. यासाठी चीनने १३ देशांची निवड केली आहे. यापूर्वी पूर्व आफ्रिकेतील जिबूती देशात चीनने सैन्यतळ बनवला आहे. चीनचा दावा आहे, ‘जिबूती येथील सैनिकी तळ केवळ प्रशासकीय आवश्यकतांसाठी आहे.’ चीन असे सांगत असला, तरी तेथे त्याने त्याच्या लढाऊ नौका तैनात केल्या आहे. सध्या तेथे ४० नौसैनिक आहेत.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने वर्ष २०२१ च्या अहवालात म्हटले होते की, चीन आफ्रिका खंडातील देशांत त्याचा सैनिकी तळ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या त्याने तेथील ४६ बंदरांची निर्मिती केली आहे किंवा त्यांना अर्थसाहाय्य केले आहे. ही बंदरे चीनकडून संचालित केली जात आहेत. चीनने मोझांबिक देशातील बीरा येथे नौदलाचा तळ विकसित केला आहे. चीन आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यावरील इक्वेटोरियल गिनी देशामध्येही सैन्यतळ बनवण्याचा विचार करत आहे. चीनने या देशाला कर्ज दिलेले आहे.