मुंबई – गरिबातील गरीब नागरिक रेल्वेचा उपयोग करतात. महाराष्ट्रात रेल्वेचे सर्वांत मोठे जाळे आहे. मागील काही वर्षे रेल्वे विभाग दुर्लक्षित होता; मात्र पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रशासनाने रेल्वेसाठी सर्वाधिक निधी दिला आहे. ‘वंदे भारत’ रेल्वे म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई यांसाठी यशस्वी पाऊल आहे. महाराष्ट्रातील लाखो नागरिक या रेल्वेचा लाभ घेतील. हे सरकार सर्वसामान्यांच्या हृदयातील सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. वंदे भारत रेल्वेच्या उद़्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देशात उल्लेखनीय स्थानक ठरेल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
‘वंदे भारत’ रेल्वे हे देशवासियांसाठी आश्चर्याची गोष्ट आहे. भारतात अशा प्रकारची रेल्वे चालू होईल, अशी कुणाला कल्पना नव्हती. केंद्रशासनाने वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील रेल्वेसाठी १३ सहस्र ५०० कोटी रुपये दिले आहेत. यातून महाराष्ट्रातील १२४ रेल्वेस्थानकांचा विकास होणार आहे. भारताच्या आधुनिकीकरणामध्ये मोदी यांचे नाव लिहिले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देशात उल्लेखनीय स्थानक ठरेल.
केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी चालू अर्थसंकल्पामध्ये मुंबई रेल्वेसाठी २ सहस्र कोटी रुपये निधी दिला आहे. भविष्यात ‘बुलेट ट्रेन’च्या समस्या सुटतील’, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील ‘वंदे भारत’ ची वैशिष्ट्ये१. मुंबई ते सोलापूर ‘वंदे भारत’ रेल्वेतून तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, अक्कलकोट, सिद्धेश्वर या तीर्थक्षेत्रांना भेट देता येईल. यापूर्वी ‘सुपरफास्ट रेल्वेला ७.५५ घंटे इतका वेळ लागत होता. ‘वंदे भारत’ रेल्वे हा प्रवास ६.३० घंट्यांमध्ये पूर्ण करेल. २. मुंबई ते शिर्डी ‘वंदे भारत’ रेल्वेतून शिर्डी, त्र्यंबकेश्वर, पंचवटी या तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे. या रेल्वेला घाटात दुसरे इंजिन लावण्याची आवश्यकता नाही. ३. यापूर्वीच्या ८ ‘वंदे भारत’ या एका राज्यातून अन्य राज्यांत जाणार्या आहेत; महाराष्ट्रातील एका शहरातून अन्य शहरात जाणार्या या पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वे आहेत. |