पत्रकाराच्या हत्येप्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही ! – पालकमंत्री उदय सामंत

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरण

पत्रकार शशिकांत वारीशे – अपघात की हत्या ?

रत्नागिरी – राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक केला असल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी वाहनचालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे, या घटनेविषयी ‘पत्रकाराच्या हत्येप्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही’, असे सांगून पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना आश्‍वस्त केले.

(सौजन्य : TV9 Marathi) 

६ फेब्रुवारीला राजापूर तालुक्यातील कोदवली येथील पेट्रोलपंपासमोर अतीवेगाने येणार्‍या महिंद्रा थार या गाडीने पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते घायाळ झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हालवण्यात आले होते; मात्र ७ फेब्रुवारीच्या सकाळी उपचार चालू असतांना त्यांचे निधन झाले होते. या घटनेनंतर वारीशे यांच्या नातेवाइकांनी तक्रार दाखल करत हे प्रकरण घातपात असल्याचे म्हटले होते, तर पत्रकारांनी ‘चालक आंबेरकर यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला जावा’, अशी मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री सामंत बोलत होते.

पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, या घटनेत प्राथमिक स्तरावर कलम ३०४ आणि नंतर नातेवाइक अन् पत्रकार यांनी केलेल्या वक्तव्यावरून हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य असल्याने ३०२ कलम लावण्यात आले आहे. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईचे निर्देश देण्यात आले असून जो कुणी आहे, तो रिफायनरी समर्थक असूदे किंवा रिफायनरी समर्थक नसूदे, योग्य तो न्याय दिला जाईल. या घटनेचा जसा पत्रकारांनी निषेध केला आहे, तसा मीही या घटनेचा निषेध करतो. या प्रकरणी सर्वस्तरावर चौकशी केली जाईल. जो कुणी यामागे आहे, त्याची चौकशी पोलीस करतीलच. या प्रकरणी संबंधितांवर अधिकाधिक कडक कारवाई केली जाईल, जेणेकरून अशी वेळ पुन्हा पत्रकारांवर येणार नाही.