|
नागपूर – ‘क्रिप्टो करन्सी’(आभासी चलन)साठी १ कोटी ८० लाख रुपये दिल्यावरही ती न मिळाल्याने त्याविषयी केलेल्या तक्रारीच्या अर्जावरून धमकावत २७ लाख रुपये घेणारा पोलीस उपनिरीक्षक धनाजी मारकवाड यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे. या प्रकरणाचे अन्वेषण आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे. धनाजी मारकवाड हे कळमना पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
२१ डिसेंबर २०२२ या दिवशी वास्तूविशारद असलेले किशोर झाम (वय ६१ वर्षे) यांना अजय बत्रा यांनी १ कोटी ८० लाख रुपये दिले होते, तसेच त्यातून कॉरबिट नावाची क्रिप्टो करन्सी घेण्यासाठी त्यांनी सांगितले; मात्र किशोर झाम यांनी ती करन्सी खरेदी न करता तो पैसा स्वतःच्या लाभासाठी वापरला आहे, असा आरोप बत्रा यांनी केला आहे. त्याविषयी त्यांनी कळमना पोलिसांकडे तक्रार केली होती.
या प्रकरणाचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक धनाजी मारकवाड करत होते. त्यांनी किशोर झाम यांना त्यांच्याविरुद्ध एम्.पी.आय.डी. नियम लावून त्यांना कारागृहात टाकण्याची धमकी दिली. (धमकी देणार्यांना पोलीस म्हणायचे कि गुंड ? – संपादक) त्यानंतर त्यांनी अजय बत्रा यांच्याकडून प्रकरण मिटवण्यासाठी २७ लाख रुपये घेतले. किशोर झाम यांनी याविषयी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी अन्वेषण करून मारकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवला. (यावरून पोलीसदलात भ्रष्टाचाराने किती थेैमान घातले आहे, हे लक्षात येते. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यावर तेथे न्याय मिळण्याऐवजी तक्रारदारांची लुबाडणूक होते, हे लज्जास्पद आहे. अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्हणता येईल का ? – संपादक)
तक्रारकर्त्यांना आयुक्तांकडून न्याय !
या प्रकरणासह अनेक प्रकारणात संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांकडून चांगली वागणूक दिली जात नाही. याशिवाय मोठ्या आर्थिक व्यवहाराची चौकशी असल्यास त्यातून हिस्सा मिळवण्यासाठी अनेक कर्मचारी एकत्र येऊन तडजोड घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात. त्यातून मोठे आर्थिक व्यवहारही होतात; मात्र ही गोष्ट समोर येत नाही, असे समजते. पोलीस आयुक्तांकडून अशा प्रकरणावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. (पोलीस आयुक्त सर्व कारभार पहाणार असतील, तर पोलीस ठाण्याचा पांढरा हत्ती जनतेच्या पैशातून पोसायचा कशाला ?- संपादक)
संपादकीय भूमिकापोलिसांच्या अशा भ्रष्ट कारभारामुळे जनतेमध्ये पोलीसदलाची प्रतिमा मलीन होऊन जनतेचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत झाला आहे. पोलीसदलातील भ्रष्ट पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना शोधून त्यांना बडतर्फ केले पाहिजे, तसेच त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे. |