संमेलनातील परिसंवादांकडे पाठ फिरवणार्‍या दर्शकांचा नेते आणि कलावंत यांना पुष्‍कळ प्रतिसाद !

वर्धा येथील ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन

वर्धा, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात दर्शकांना वाचन, साहित्‍य आणि विचार यांच्‍याविषयी रुची नसल्‍याचे लक्षात आले. राजकीय नेते आणि वलयांकित व्‍यक्‍ती यांचे विचार ऐकायला दर्शकांनी प्रचंड गर्दी केली होती, तर परिसंवादांकडे मात्र पाठ फिरवण्‍यात आली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्‍या प्रकट मुलाखतीला दर्शकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. संमेलनाचे अध्‍यक्ष निवृत्त न्‍या. नरेंद्र चपळगावकर यांचे अध्‍यक्षीय भाषण चालू असतांना तर मुख्‍य सभागृहातील १० टक्‍केच आसंद्या भरल्‍या होत्‍या.

संमेलनामध्‍ये विविध विषयांवरील परिसंवाद आयोजित केले होते. याला १०० ते १५० लोक उपस्‍थित असल्‍याचे दिसत होते. दुसरीकडे चित्रपट कलावंत आणि राजकीय नेते यांच्‍या उपस्‍थितीला प्रचंड प्रतिसाद मिळत होता.