९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन मारामार्‍या होऊ नयेत; म्‍हणून वाचन केले पाहिजे ! – नागराज मंजुळे, दिग्‍दर्शक

नागराज मंजुळे

वर्धा, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – झाडांवरील पुस्‍तके वाचण्‍यापेक्षा झाडे लावली पाहिजेत. गेल्‍या ६० वर्षांत पुष्‍कळ कविता-कादंबर्‍या झाल्‍या. त्‍यापेक्षा झाडे लावली, तर ते आपल्‍याला प्राणवायू देतात. वलयांकित माणसे आपल्‍याला अन्‍न-पाणी देत नाहीत. त्‍यामुळे झाडे जपली पाहिजेत, असे विधान अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्‍हटले. त्‍यावर चित्रपट दिग्‍दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘कुणी कुणाच्‍या डोक्‍यात दगड घालू नये आणि मारामार्‍या करू नयेत; म्‍हणून वाचन केले पाहिजे. नाहीतर झाडे वाचतील आणि माणसे मरतील’, असे  .

वर्धा येथील ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या दुसर्‍या दिवशी ‘मुक्‍तसंवाद’ आयोजित करण्‍यात आला होता. यात बालाजी सुतार यांनी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, चित्रपट दिग्‍दर्शक नागराज मंजुळे, किशोर कदम, लेखक अरविंद जगताप यांच्‍याशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी वर्धा जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले होते. या वेळी मान्‍यवरांनी त्‍यांच्‍या जीवनातील काही प्रसंग सांगितले, तसेच कविता ऐकवून उपस्‍थितांची मने जिंकली.

या वेळी सयाजी शिंदे वृक्षलागवडीचे महत्त्व सांगतांना म्‍हणाले, ‘‘आई आणि पृथ्‍वीमाता यांहून जगात मोठी गोष्‍ट नाही. त्‍यांना सांभाळले पाहिजे. मी आईच्‍या वजनाएवढ्या बियांची झाडे लावण्‍याचा संकल्‍प केला होता. त्‍यानुसार झाडांची लागवड करणे चालू आहे. झाडांची सावली आणि फळे यांमध्‍ये मला आईचे रूप पहायला मिळते. पैशाने नाही, तर मनाला शांती मिळाली की, माणूस मोठा होतो आणि झाडाखाली बसलो की, शांती मिळते.’’