‘गुरूंचे समष्टी रूप सर्वत्र आहे’, असा भाव ठेवावा, अशी शिकवण अनेकांना दिली जाते; पण तसा भाव ठेवणे आणि अनुभवणे फारच थोड्यांना जमते. देहली सेवाकेंद्रात गेलेले श्री. अशोक शांताराम दहातोंडे हे माझ्या माहितीतील असे एकमेव साधक आहेत. त्यांना हे साध्य कसे झाले, त्यांनी त्यासाठी साधना काय केली इत्यादी माहिती त्यांनी या लेखात दिल्या आहेत. या अनुभूतींबद्दल त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे. त्यांनी ही अनुभूती काही साधकांना तरी यावी, यासाठी साधकांना मार्गदर्शन करावे, म्हणजे त्यांची समष्टी साधनाही वेगाने होईल आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.३.२०२२) |
१. उन्हात बसून नामजप करतांना ‘सूर्यनारायण परात्पर गुरु डॉक्टरांचे समष्टी रूप आहे’, असा भाव ठेवणे
१ अ. ‘चराचरात गुरुदेव आहेत’, असा भाव ठेवून उन्हाचे उपाय करतांना सूर्यनारायणाच्या ठिकाणी परात्पर गुरुमाऊलींना अनुभवणे आणि त्यामुळे आनंद होणे : ‘भूवैकुंठस्वरूप रामनाथी आश्रमात येऊन मला १ मास झाला होता; पण मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले नव्हते. मला वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांनी प्रतिदिन उन्हाचे उपाय (उन्हात बसणे) करायला सांगितले होते. मी रामनाथी आश्रमात आल्यापासून ‘चराचरात गुरुदेव आहेत’, असा भाव ठेवून सकाळी उन्हात बसून नामजपादी उपाय करू लागलो. त्या वेळी मी सूर्यनारायणाच्या ठिकाणी श्री सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरुमाऊलींना अनुभवू लागलो. तेव्हा परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर जसा आनंद होतो, तसा आनंद मी अनुभवू लागलो.
१ आ. सूर्यनारायणाच्या रूपात परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाल्याने दिवसभर सेवेत उत्साह आणि आनंद जाणवणे : ‘सूर्यनारायण हे आमच्या गुरुदेवांचेच समष्टी रूप आहे. या रूपाद्वारे ते सर्व ठिकाणच्या साधकांना दिव्य दर्शन देऊन साधकांना धन्य धन्य करतात’, असा भाव ठेवून उन्हाचे उपाय केल्यावर सूर्यनारायणाच्या ठिकाणी मला प्रत्यक्ष गुरुदेवांचे दर्शन होऊन मन आनंदी होऊ लागले. त्यामुळे मला दिवसभर सेवेत उत्साह आणि आनंद जाणवू लागला.
२. ‘प्रत्येक साधक परात्पर गुरु डॉक्टरांचे समष्टी रूप आहे’, असा भाव ठेवल्याने ‘गुरुदेव सतत समवेत आहेत’, असे जाणवून ‘त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचे विचार आणि इच्छा न्यून झाली’, असे लक्षात येणे
गुरुदेवांनी शिकवलेले ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, हे आध्यात्मिक तत्त्व अनुभवल्यामुळे माझ्याकडून प्रत्येक ठिकाणी परात्पर गुरुदेवांना अनुभवण्याचा प्रयत्न होऊ लागले. मी ‘प्रत्येक देवता, साधक आणि निसर्ग’ यांमध्ये गुरुदेवांना पहाणे अन् अनुभवणे’, असा प्रयत्न करू लागलो. त्यानंतर माझ्यात साधकांप्रती एक वेगळी सकारात्मकता निर्माण होऊन साधकांकडे पहाण्याच्या दृष्टीकोनात पालट झाला. ‘सनातनचा प्रत्येक साधक म्हणजे गुरुदेवांचे समष्टी रूप आणि प्रत्यक्ष गुरुदेवच आहेत’, असा अनुभव मला येऊ लागला. परात्पर गुरुदेव ‘समष्टी रूपात मला सतत दर्शन देतात’, या भावामुळे ‘ते अखंड माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवते. त्यामुळे ‘गुरुदेवांना प्रत्यक्ष भेटण्याविषयीचे माझे विचार आणि इच्छा न्यून झाली आहे’, असे मला जाणवले.
३. ‘परात्पर गुरु डॉक्टर सेवेत सतत साहाय्य करत आहेत’, याची जाणीव होऊन भावजागृती होणे
‘परात्पर गुरु डॉक्टर सेवेत सतत साहाय्य करतात’, असे मला जाणवते. ते मला सेवेच्या सूत्रांविषयी कधी आतून, तर कधी साधकांच्या माध्यमातून सुचवतात. ते मला ‘योग्य-अयोग्य’ यांची जाणीव करून देतात. त्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटते. मी एकांतात असतांना माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागतात. गुरुदेव करत असलेल्या अपार कृपेमुळे मला वाटते, ‘याच भावस्थितीत राहून डोळ्यांतून वहात असलेल्या भावाश्रूंनी गुरुस्तुतीरूपी मंत्र आणि स्तोत्ररूपी शब्द यांचा उच्चार करत त्यांची पाद्यपूजा करावी.’
‘हे सर्वव्यापी सच्चिदानंद, परब्रह्मस्वरूप परात्पर गुरुमाऊली, तुमच्या श्री चरणी काय आत्मनिवेदन करावे ? तुमचा महिमा आणि कृपा अपार आहे. ‘या कृपेबद्दल तुमची कशी स्तुती करावी ?’, हे मला कळत नाही. कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता ! ‘हा लेख लिहून घेतांनाही तुम्ही माझी भावजागृती करवून घेतली’, त्याबद्दल कृतज्ञता !’
– आपला चरणसेवक होण्यासाठी धडपडत असलेला अपात्र जीव,
श्री. अशोक शांताराम दहातोंडे, देहली सेवाकेंद्र (७.२.२०२२)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |