राज्‍यातील सर्व शाळांमध्‍ये ‘आजी-आजोबा दिवस’ साजरा होणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – सध्‍या मातृदिन, पितृदिन, महिलादिन, कन्‍यादिन, योगदिन असे विविध दिवस साजरे केले जातात. आता राज्‍यातील सर्व शाळांमध्‍ये ‘आजी-आजोबा दिवस’ साजरा केला जाणार आहे. याविषयी शासन निर्णय झाला असून त्‍याचे परिपत्रकही लागू करण्‍यात आले आहे. प्रत्‍येक वर्षी सप्‍टेंबच्‍या पहिल्‍या सोमवारनंतर येणार्‍या रविवारी ‘आजी-आजोबा दिवस’ साजरा केला जातो. त्‍या अनुषंगाने यंदा १० सप्‍टेंबर २०२३ या दिवशी ‘आजी-आजोबा’ दिवस आहे.

राज्‍य, जिल्‍हा आणि शाळास्‍तरांवर अन् त्‍यानंतरच्‍या कार्यालयीन दिवशी ‘आजी-आजोबा’ दिवस साजरा करण्‍यात यावा, तसेच या प्रस्‍तावित दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करता न आल्‍यास शाळेने आपल्‍या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस ‘आजी-आजोबा’ दिवस म्‍हणून साजरा करावा, असे शासन निर्णयात म्‍हटले आहे.

विविध उपक्रम राबवण्‍याच्‍या सूचना !

आजी-आजोबांसाठी राबवायचे उपक्रम !

१. सर्व विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या आजी-आजोबांचा परिचय करून द्यावा.

२. आजी-आजोबांच्‍या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला आणि नृत्‍य असे कार्यक्रम आयोजित करावेत.

३. विटीदांडू, संगीत आसंदी असे खेळही ठेवण्‍यास हरकत नाही. यामुळे बालपणीच्‍या आठवणींना उजाळा मिळेल.

४. आजी-आजोबांसमवेत शाळेतील शिक्षकांनीही सहभाग घ्‍यावा.

५. पारंपरिक वेशभूषेमध्‍ये आजी-आजोबांना बोलवावे.

६. महिलांसाठी मेहंदी आणि वेगवेगळ्‍या उपक्रमांचे आयोजन करण्‍यात यावे.

७. शाळेतील विद्यार्थ्‍यांनीही आपल्‍या लाडक्‍या आजी-आजोबांसाठी या वेळी कलाकृती सादर कराव्‍यात.

८. ‘आजीच्‍या बटव्‍या’चे महत्त्व विद्यार्थ्‍यांना सांगावे. झाडे लावणे आणि पर्यावरणाचे महत्त्वही विद्यार्थ्‍यांना सांगावे.