सातारा जिल्‍ह्यातील दुष्‍काळी भागाला कायमस्‍वरूपी पाणी देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सातारा, १ फेब्रुवारी (वार्ता.) – सातारा, खटाव आणि कोरेगाव तालुक्‍यातील अनेक गावे सिंचनापासून वंचित आहेत. या गावांचा समावेश भविष्‍यातील सिंचन योजनेत किंवा नवीन सिंचन प्रकल्‍पातून पाणी देण्‍यासाठी फेर सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील मुख्‍यमंत्री शिंदे यांच्‍या दालनामध्‍ये सिंचनाविषयी झालेल्‍या बैठकीत ते बोलत होते. कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, सातारा जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी आणि कृष्‍णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्‍थित होते.

मुख्‍यमंत्री म्‍हणाले की, कोयना धरणामध्‍ये बुडीत बंधारे बांधण्‍यात येणार असून उन्‍हाळ्‍यात धरण परिसरातील गावांना पाणी उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. सोळशी धरणाचे सर्वेक्षण करून दुष्‍काळी वंचित भागाला पाणी देण्‍यात येईल. नेर तलावाला कालवा काढून पाणी देण्‍यात येईल. सिंचनापासून वंचित असलेल्‍या गावांना सर्वेक्षण करून पाणी उपलब्‍ध करून देण्‍यात येईल.