सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करतांना नोकरीनिमित्त समाजात जात असतांना जाणवलेली सूत्रे आणि वैयक्‍तिक प्रसंगांत गुरुदेव समवेत असल्‍याची आलेली प्रचीती !

श्री. पुरुषोत्तम वागळे

१. रत्नागिरी येथे असतांना सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ होणे

‘वर्ष १९८२ ते वर्ष १९९६ या कालावधीत मी रत्नागिरी येथे पोलीसदलात नोकरीला होतो. त्‍या कालावधीत वर्ष १९९४ मध्‍ये रत्नागिरी येथे सनातनच्‍या साधकांनी साधनेविषयी अभ्‍यासवर्ग घेणे चालू केले. मी तिसर्‍या अभ्‍यासवर्गाला उपस्‍थित राहिलो होतो. त्‍या वेळी मिळालेल्‍या मार्गदर्शनानुसार मी साधनेला आरंभ केला.

२. लांजा येथे भाड्याच्‍या घरात रहात असतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना आत्‍मनिवेदन करणे आणि त्‍यांनी सूक्ष्मातून मनाचे कार्य समजावून सांगणे

वर्ष १९९६ मध्‍ये माझे लांजा येथे स्‍थानांतर झाले. त्‍या ठिकाणी मी मुलांच्‍या शिक्षणासाठी कुटुंबासह भाड्याच्‍या घरात रहात होतो. तेव्‍हा मी देवघरात प.पू. भक्‍तराज महाराज आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे ठेवली होती. पूजा झाल्‍यावर मी गुरुदेवांशी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याशी) सूक्ष्मातून बोलत असे आणि ते मला काही सांगत असत. मला त्‍याविषयी फारसे काही आठवत नाही; पण त्‍या वेळी त्‍यांनी मला मनाचे कार्य समजावून सांगितले.

३. पोलीसदलात नोकरी करतांना आलेले अनुभव

३ अ. घटनास्‍थळी गेल्‍यावर त्‍या घरांतील वाईट स्‍पंदनांमुळे डोके जड होणे : काही वेळा गुन्‍ह्याच्‍या आणि अकस्‍मात् मृत्‍यूच्‍या तपासासाठी मला घटनास्‍थळी काही घरांत जावे लागत असे. काही घरांमध्‍ये इतकी वाईट स्‍पंदने असायची की, त्‍या ठिकाणी माझे डोके जड होत असे. त्‍यामुळे मला ‘तेथे थांबू नये’, असे वाटायचे.

३ आ. चुलीवर स्‍वयंपाक करतांना महिला १०० टक्‍के भाजल्‍याने त्‍या घरी पंचनाम्‍यासाठी गेल्‍यावर जाणवलेली सूत्रे

३ आ १. घर वास्‍तूशास्‍त्रानुसार बांधले नसल्‍याचे लक्षात येणे : अशाच एका गावातील वाडीमध्‍ये एक महिला चुलीवर स्‍वयंपाक करतांना १०० टक्‍के भाजल्‍याने तिचा मृत्‍यू झाला. त्‍या ठिकाणी मी पंचनामा करण्‍यासाठी गेलो असतांना त्‍या घरातील वाईट स्‍पंदनांमुळे मला तपास करायला काही सुचेना. मला पंचनाम्‍यात ‘घराची रचना कशी आहे ?’, ते नमूद करावे लागणार होते. माझ्‍या लक्षात आले, ‘घराचे मुख्‍य दार आणि आतील सर्व दारे दक्षिण दिशेला तोंड येईल’, अशा पद्धतीने बसवलेली आहेत. स्‍वयंपाकघरातील चुलीचे तोंडही दक्षिण दिशेकडे आहे.’

३ आ २. ज्‍योतिषांनी घरमालकाला घर वास्‍तूशास्‍त्रानुसार बांधले नसल्‍याचे सांगूनही त्‍यांनी घराच्‍या दारांची रचना न पालटणे : तपास पूर्ण झाल्‍यावर मला रहावेना; म्‍हणून मी त्‍या घरमालकाला विचारले, ‘‘घराची दारे दक्षिण दिशेकडे का बसवली ?’’ त्‍यावर ती व्‍यक्‍ती मला म्‍हणाली, ‘‘घराच्‍या दक्षिण दिशेला काही अंतरावर आमचे मंदिर आहे. त्‍यासाठी त्‍या दिशेला घराची सर्व दारे बसवली आणि चुलीचे तोंडही त्‍या दिशेला केले.’’ त्‍यावर मी त्‍या व्‍यक्‍तीला शास्‍त्र सांगितले आणि ‘सुख का मिळत नाही ?’, याविषयी सांगितले. त्‍यावर ती व्‍यक्‍ती मला म्‍हणाली, ‘‘गुरुजींनीही (त्‍या भागातील एक ज्‍योतिषी) मला असेच सांगितले होते आणि दारे पालटायला सांगितली होती. ती माझ्‍याकडून राहून गेली.’’

३ इ. घरांतील स्‍पंदनांविषयी मनात विचार येत असतांना त्‍यातून साधनेची हानी होऊ नये; म्‍हणून त्‍याकडे दुर्लक्ष करणे : एकदा मी एका ठिकाणी तपासाला गेलो होतो. त्‍या ठिकाणची एक महिला चुलीवर स्‍वयंपाक करत असतांना १०० टक्‍के भाजून तिचा मृत्‍यू झाला. त्‍याही घराची स्‍थिती वास्‍तूशास्‍त्राच्‍या विरुद्धच होती. त्‍याही घराचा दर्शनी दरवाजा, देवघराचे तोंड, तसेच चुलीचे तोंड दक्षिण दिशेला होते. तेथील स्‍पंदनेही वाईट होती; परंतु त्‍या ठिकाणी मी काही बोललो नाही. मलाच प्रश्‍न पडला, ‘मला याविषयी ज्ञान नसतांना माझ्‍या हे कसे लक्षात येते ?’ ‘कुणीतरी वाईट शक्‍तीच मला मोहात अडकवत आहे आणि साधनेपासून दूर नेत आहे’, असे माझ्‍या मनात आल्‍याने मी तसे पहाणे सोडून दिले. अजूनही मी त्‍यादृष्‍टीने पाहिले, तर चांगली अणि वाईट स्‍पंदने मला जाणवतात. त्‍यामध्‍ये अडकून माझ्‍या साधनेची हानी होऊ नये; म्‍हणून मी तसे पहात नाही.

३ ई. काही ठिकाणी वाईट शक्‍तींचे चेहरे सतत दिसणे आणि त्‍यांच्‍याकडे पहाण्‍याचे टाळणे : तपासाच्‍या वेळी मी काही घरांत गेल्‍यावर मला तेथील लाद्या आणि भिंती यांवर, तसेच झाडा-झुडपांमध्‍ये विद्रूप चेहरे दिसत होते. एकाच चेहर्‍यामध्‍ये आणखी २ – ३ चेहरे असल्‍याचे मला जाणवायचे. मी तेही पहाण्‍याचे सोडून दिले; कारण ते वाईट शक्‍तींचे चेहरे होते. ज्‍या वेळी मी ते पहात होतो; त्‍या वेळी ते चेहरे सतत माझ्‍या दृष्‍टीसमोर येत असत. मी तेही पहाण्‍याचे सोडून दिले.

४. अनुभवलेली गुरुकृपा

४ अ. परिसरातील कोरोनाच्‍या वाढत्‍या संसर्गामुळे मुलात कोरोनासदृश लक्षणे आढळणे, पत्नीला गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून औषधोपचार करण्‍यास सांगणे आणि नंतर ४ दिवसांनी केलेल्‍या मुलाच्‍या वैद्यकीय तपासणीत गुरुकृपेने त्‍याच्‍या चाचण्‍यांच्‍या अहवालात कोरोना नसल्‍याचे समजणे : जुलै २०२१ पूर्वी आम्‍ही रत्नागिरी येथे रहात असलेल्‍या परिसरात कोरोनाचा संसर्ग अधिक होता. तेथे कोरोनामुळे काही जणांचा मृत्‍यू झाला. त्‍या वेळी ‘आपल्‍याकडे गुरुदेवांचे लक्ष आहे. आपल्‍याला काही त्रास होणार नाही’, असे आम्‍हाला वाटत होते.

त्‍यानंतर मी रामनाथी आश्रमात आलो. त्‍यानंतर काही दिवसांनी माझ्‍या मुलाला कोरोनासदृश लक्षणे दिसून आली. त्‍याला ताप येऊ लागला; म्‍हणून पत्नीने मला भ्रमणभाष करून कळवले. त्‍यावर मी तिला म्‍हणालो, ‘‘मी येऊन काय करणार आहे ? तू आधुनिक वैद्यांकडून औषध घे. गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून तू औषधोपचार चालू ठेव.’’ त्‍या वेळी ‘गुरुदेव ४ दिवस आमच्‍या घरी आहेत’, असे मला जाणवत होते. त्‍यामुळे मी निश्‍चिंत होतो. चौथ्‍या दिवशी मुलाच्‍या वैद्यकीय तपासण्‍या करून घेतल्‍यावर सर्व चाचण्‍यांचे अहवाल आल्‍यावर कोरोना नसल्‍याचे समजले. ही आमच्‍यावर गुरुदेवांची कृपाच आहे. गुरुकृपेनेच आम्‍ही सुरक्षित आहोत.

४ आ. वर्ष २०२१ मधील गुरुदेवांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या दिवशी त्‍यांच्‍या छायाचित्राचे पूजन केल्‍यानंतर वातावरणात चैतन्‍यमय पालट जाणवणे आणि अन्‍य साधकांनाही असे जाणवल्‍याचे समजल्‍यावर ‘गुरुदेव सर्व साधकांच्‍या समवेत आहेत’, असे लक्षात येणे : वर्ष २०२१ मधील गुरुदेवांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या दिवशी मी देवघरातील देवांची पूजा करून घरातील बैठककक्षातील पटलावर गुरुदेवांचे छायाचित्र ठेवून पूजा केली. नंतर मी आरती करून नैवेद्य दाखवला. त्‍यानंतर अकस्‍मात् घरातील स्‍पंदनांत पालट होऊन वातावरण चैतन्‍यमय झालेे. मला गुरुदेवांचे अस्‍तित्‍व जाणवू लागले. मी ४ साधकांना भ्रमणभाष करून विचारले, ‘‘आज कसे वाटत आहे ?’’ ते म्‍हणाले, ‘‘आम्‍हाला चांगले वाटत आहे.’ तेव्‍हा ‘गुरुदेव आज सर्व साधकांच्‍या समवेत आहेत’, हे माझ्‍या लक्षात आले. गुरुदेवांनी दिलेल्‍या ‘एकोऽहम् । बहु स्‍याम् ।’ म्‍हणजे ‘मी एक आहे, तो अनंत रूपांमध्‍ये प्रकट होईन’ या वचनाची मला निश्‍चिती झाली.

४ इ. नामस्‍मरण करतांना झोप लागल्‍यानंतर विविध अनुभूती येऊन वेगळाच आनंद मिळणे : मला नामस्‍मरण करत असतांना काही वेळा झोप लागते. त्‍याच स्‍थितीत मला छातीत पांढरा प्रकाश दिसू लागतो. त्‍या प्रकाशामधून मला नामाचा ध्‍वनी ऐकू येतो. त्‍यातून मला मिळणारा आनंद पुष्‍कळ वेगळाच असतो. घरातील व्‍यक्‍ती ‘मी झोपी गेलो आहे’, असे समजून मला हाक मारून उठवतात. ‘मला काय जाणवते ?’, हे मी त्‍यांना सांगून पटणारे नसल्‍याने मी त्‍यांना त्‍याविषयी सांगितले नाही; परंतु मलाही त्‍याविषयी काही अर्थबोध झाला नाही.’

– श्री. पुरुषोत्तम वागळे, कारवांची वाडी, रत्नागिरी. (२०.११.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक