पंढरपूर येथील माघ वारीसाठी सोलापूर विभागातून १६० जादा गाड्यांचे नियोजन ! – विनोदकुमार भालेराव, विभाग नियंत्रक

सोलापूर, ३१ जानेवारी (वार्ता.) – वारकर्‍यांच्‍या सुविधेसाठी पंढरपूर येथे होणार्‍या माघ वारीच्‍या निमित्ताने सोलापूर आगारातून १६० जादा बसगाड्या सोडण्‍यात आल्‍या आहेत. सोलापूर आगारातून प्रत्‍येकी १५ मिनिटाला पंढरपूरकडे बसगाडी रवाना होत आहे. माघ वारीच्‍या निमित्ताने १ कोटी ५८ लाख रुपये उत्‍पन्‍नाचे उद्दीष्‍ट ठेवण्‍यात आले आहे, अशी माहिती राज्‍य परिवहन महामंडळाचे सोलापूर जिल्‍ह्याचे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली.

विभाग नियंत्रक पुढे म्‍हणाले,‘‘बस सुविधेला सोलापूर जिल्‍ह्यात प्रतिसाद चांगला असून एस्.टी.वरील नागरिकांचा विश्‍वास आणखी वाढवण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. येणार्‍या काळात सोलापूर जिल्‍ह्यासाठी ५० ते ७५ इलेक्‍ट्रीक बसगाड्या अपेक्षित असून त्‍या २५० ते ३०० किलोमीटर अंतरापर्यंत धावतील. त्‍यासाठी आवश्‍यक ‘चार्जिंग पॉईंट’ सिद्ध करण्‍याचे नियोजनही चालू आहे. जिल्‍हा पातळीवर एस्.टी.साठी आणखीन नवीन सुविधा कोणत्‍या देता येतील ? यासाठीही आमचे प्रयत्न चालू आहेत.’’