पुणे – येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण हे मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ‘बालभारती’ हा पुस्तक निर्मिती करणारा विभाग असला, तरी पुढील काळासाठी चित्रफीतीद्वारे लहान मुलांना शिक्षणाची सोय करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते ‘बालभारती’च्या ५६ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते.
केसरकर म्हणाले की, आपल्या जीवनात ‘बालभारती’चे एक आगळेवेगळे स्थान आणि महत्त्व आहे. ‘बालभारती’चे आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेतच व्यक्तिमत्त्व विकास करून देशाचे नेतृत्व करावे. विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेचा ताण न घेता परीक्षांना चांगल्याप्रकारे सामोरे जाऊन यशस्वी व्हावे.