आपले शरीर शत्रूच्या हाती लागू नये, यासाठी घोड्यासहित गडावरून उडी घेणारी शूरवीर झाशीची राणी लक्ष्मीबाई !
‘भारतामध्ये अनेक पराक्रमी राजे झाले, उदा. गोब्राह्मण शिवछत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई. झाशीच्या राणीने युद्ध करत असतांना पोटच्या मुलाला पाठीवर घेतले होते. ‘युद्धात हरत आहे’, हे तिच्या लक्षात आल्यावर ‘आपले शरीर शत्रूच्या हाती लागू नये’; म्हणून तिने घोड्यासहित गडावरून उडी घेतली. झाशीची राणी लक्ष्मीबाई इतकी शूर होती !’
– पू. (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
कवींनी गौरवलेली राणी लक्ष्मीबाई !
झाशीची राणी लक्ष्मीबाई : ‘केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या राणीच्या मृत्यूस्थानी उभ्या असलेल्या चौथर्यावर कवी भा.रा. तांबे यांच्या कवितेतील ओळी कोरल्या आहेत,
‘हे हिंदबांधवा, थांब या स्थळी । अश्रू दोन ढाळी ।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशीवाली ॥’
राणीचा गौरव – खूब लडी मर्दानी,
वह तो झांसीवाली रानी थी ।
अशा प्रकारे हिंदीमध्ये सुभद्राकुमारी चौहान यांनी ‘गौरवशाली झांशी’ ही कविता लिहिली. यात त्या लिहितात,
दिखा गई पथ, सिखा गयी हमको,
जो सीख सिखानी थी ।
बुंदेल हरबोलों के मुख,
हमने सुनी कहानी थी ।
खूब लडी मर्दानी,
वह तो झांसीवाली रानी थी ॥’
– डॉ. सच्चिदानंद शेवडे (श्रीगजानन आशिष)
राणी लक्ष्मीबाईंमधील वैशिष्ट्यपूर्ण गुण !
१. नियमित शारीरिक व्यायाम
लक्ष्मीबाईला लहानपणापासून व्यायाम करणे, नियमित घोड्यावरून रपेट करणे यांची आवड होती. झाशीची राणी झाल्यानंतरही ती पहाटे लवकर उठून मल्लखांबाची कवायत करत असे. नंतर घोड्यावर बसून रपेट मारणे आणि लगेच हत्तीवर बसून फेरफटका मारून येणे, हा तिचा दिनक्रम होता.
२. उत्तम अश्वपरीक्षक
राणी लक्ष्मीबाई उत्तम अश्वपरीक्षक होती. त्यासाठी तिचा त्या काळी नावलौकिक होता. एकदा घोडे विकणारा एक व्यापारी त्याच्याकडील दोन उमदे घोडे घेऊन श्री उज्जैन क्षेत्री राजे बाबासाहेब आपटे यांच्याकडे गेला; परंतु त्यांना परीक्षा करता आली नाही. त्यानंतर तो व्यापारी ग्वाल्हेरला श्रीमंत जयाजीराजे शिंदे यांच्याकडे गेला. त्यांनाही त्या घोड्यांची परीक्षा करता आली नाही. शेवटी तो झाशी येथे आला. तेव्हा राणी लक्ष्मीबाईने आधी एका घोड्यावर रपेट मारली आणि ‘तो घोडा उत्तम आहे’, असे सांगून त्यास बाराशे रुपये देऊ केले. नंतर दुसर्या घोड्याची रपेट मारून आल्यावर त्याची किंमत राणीने केवळ ५० रुपये सांगितली आणि ‘तो घोडा छातीत दुखावला आहे’, हे कारण सांगितले. तेव्हा त्या व्यापार्याने ते मान्य केले. त्याआधी जेवढ्यांनी त्याची परीक्षा केली होती, तेवढ्यांनी ‘दोन्ही घोडे समान शक्तीचे आहेत’, असेच सांगितले होते.
३. प्रजाहितदक्ष
एकदा झाशीमध्ये कडाक्याची थंडी चालू झाली. तेव्हा शहरातील १ सहस्र ते बाराशे भिकारी दक्षिण दरवाज्याजवळ गोळा झाले. राणीची महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याची ती वेळ होती. तिने जमलेल्या लोकांविषयी दिवाणजींकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी ‘हे गरीब लोक थंडीपासून बचाव होण्यासाठी पांघरूण मिळावे, याची विनंती करत आहेत’, असे राणीस सांगितले. तिने आदेश दिला की, आजपासून चौथ्या दिवशी शहरातील सर्व गरीब लोकांना प्रत्येकी एक कानटोपी, अंगात घालायला एक बंडी आणि एक घोंगडी देण्यात यावी. त्याप्रमाणे साहित्याचे वाटप केले गेले.
अ. गुन्हेगारांना त्वरित शिक्षा : झाशीच्या राज्यात बलवसागर म्हणून लहानसे शहर होते. तिथे जनतेला चोरांचा अतिशय उपद्रव होऊ लागला. तेव्हा स्वतः राणीने १५ दिवस त्या ठिकाणी तळ ठोकून चोरांचा बदोबस्त केला. कित्येक गुन्हेगारांना फाशी दिली आणि काहींना कैदेत ठेवले. (संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)