आय.एन्.एस्. वागीर’ पाणबुडी नौदलाच्‍या सेवेत रुजू !

आय.एन्.एस्. वागीर’ पाणबुडी नौदलाच्‍या सेवेत रुजू

मुंबई, २४ जानेवारी (वार्ता.) – कलवरी वर्गातील पाचवी पाणबुडी ‘आय.एन्.एस्. वागीर’ २३ जानेवारी या दिवशी नौदलाच्‍या सेवेत रुजू झाली. नौदलाच्‍या पश्‍चिम विभागाचे मुख्‍यालय असलेल्‍या मुंबईतील नौदल तळावर हा सोहळा पार पडला. ‘सायलेंट किलर’ म्‍हणून ओळख असलेल्‍या पाणबुडीच्‍या समावेशामुळे समुद्रात गस्‍त घालत लक्ष ठेवण्‍याच्‍या नौदलाच्‍या क्षमतेत वाढ होणार आहे.

मुंबईतील ‘माझगाव शिपबिल्‍डर्स लि.’ या जहाजबांधणी कारखान्‍यात ‘आय.एन्.एस्. वागीर’ची बांधणी करण्‍यात आली. या पाणबुडीची लांबी सुमारे ६७.५ मीटर असून उंची १२.३ मीटर एवढी आहे. एकूण वजन सुमारे १ सहस्र ७०० टन एवढे आहे. कलवरी वर्गातील इतर पाणबुड्यांप्रमाणे ही पाणबुडीही डिझेल आणि इलेक्‍ट्रिक प्रणालीवर कार्यरत असते. एका दमात १२ सहस्र किलोमीटर अंतर पार करू शकते. या पाणबुडीची समुद्रात जास्‍तीत जास्‍त ५० दिवस सलग संचार करण्‍याची क्षमता आहे. पाण्‍याखालील लक्ष्याचा भेद करण्‍यासाठी पाणतीर, तर पाण्‍यावरील किंवा भूमीवरील लक्ष्याला भेदण्‍यासाठी क्षेपणास्‍त्र डागण्‍याची क्षमता या पाणबुडीत आहे.