नागपूर शहरात अस्‍वच्‍छता पसरवणार्‍यांकडून ४ मासांत १२ लाखांचा दंड वसूल !

नागपूर शहरात अस्‍वच्‍छता पसरवणार्‍यांकडून ४ मासांत १२ लाखांचा दंड वसूल

नागपूर – शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्‍वच्‍छता पसरवणार्‍या हातगाड्या, स्‍टॉल्‍स, पानपट्टी, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते, वर्कशॉप, गॅरेजेस् आणि इतर दुरुस्‍ती व्‍यावसायिक हे रस्‍त्‍यावर कचरा टाकून परिसर अस्‍वच्‍छ करणार्‍यांवर येथील महापालिकेच्‍या उपद्रव शोध पथकाद्वारे धडक कारवाई करण्‍यात येत आहे. मागील ११ ऑक्‍टोबर ते ११ जानेवारी या कालावधीत हातगाड्या, स्‍टॉल्‍स, पानपट्टी, फेरीवाले आणि छोटे भाजी विक्रेते अशा ३ सहस्र १८४ जणांवर उपद्रव शोध पथकाद्वारे प्रत्‍येकी ४०० रुपयांचा दंड आकारण्‍यात आला आहे. आतापर्यंत १२ लाख ७३ सहस्र ६०० रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आला आहे.

शहराला स्‍वच्‍छ आणि सुंदर साकारण्‍यासाठी महानगरपालिका पूर्णतः कार्यरत आहेत. त्‍याच अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी अस्‍वच्‍छता पसरवून परिसराचे विद्रूपीकरण करत उपद्रव पसरवणार्‍यांच्‍या विरोधात महानगरपालिकेद्वारे कठोर पाऊल उचलले जात आहे. महानगरपालिकेच्‍या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणारे, कचरा फेकणारे, थुंकणारे आणि ५० मायक्रॉनपेक्षा न्‍यून असणार्‍या प्‍लास्‍टिक पिशव्‍यांचा वापर करणारे यांच्‍यावर कठोर कारवाई करण्‍यास प्रारंभ केला आहे.

संपादकीय भूमिका

स्‍वातंत्र्याच्‍या ७५ वर्षांनंतरही उपराजधानीसारखी शहरे अस्‍वच्‍छ असणे हा जनतेला प्रशासनाने शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !