माघी यात्रेनिमित्त अपर जिल्हाधिकार्‍यांनी घेतली नियोजन आढावा बैठक !

भाविकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेश

बैठकीला उपस्थित पदाधिकारी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २१ जानेवारी (वार्ता.) – माघ शुक्ल एकादशी १ फेब्रुवारी या दिवशी आहे. या यात्रेचा कालावधी २६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी असा आहे. यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येणार्‍या भाविकांचे आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षा यांना प्राधान्य देऊन आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामांचे दायित्व चोख पार पाडावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या. माघ वारीच्या निमित्ताने पूर्वनियोजनाच्या संदर्भात नवीन भक्त निवास येथे २० जानेवारी या दिवशी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, अपर तहसीलदार समाधान घुटूकडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी अन्न-औषध प्रशासन, परिवहन, महावितरण, आरोग्य आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.

१. या वेळी अपर जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे म्हणाले की, यात्रा कालावधीत नगरपालिकेने शुद्ध आणि पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. नदीपात्रातील वाळवंट आणि घाट यांची स्वच्छता करावी. नदीपात्रात तात्पुरते शौचालय उभारणीचे नियोजन करावे. ६५ एकरमध्ये भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरेसा वीजपुरवठा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत.

२. प्रांताधिकारी गजानन गुरव म्हणाले, ‘‘नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहील, याविषयी पाटबंधारे विभागाने नियोजन करावे. नदीपात्रात प्रशिक्षित कर्मचार्‍यासह यांत्रिक बोटी सज्ज ठेवाव्यात. आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावावेत, तसेच पार्किंगच्या ठिकाणी ‘विनामूल्य पार्किंग’चे फलक लावावेत.’’